शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शहरातील डॉ. प्रफुल्ल ब्रम्हे यांचे हातपाय बांधून त्यांच्या घरी ४० लाख रुपयांच्या झालेल्या जबरी चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना दोन महिन्यांनंतर यश आले आहे. घरातील मोलकरणीने तिचा भाऊ व मामा यांच्या मदतीने चोरी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथून दोघा आरोपींना अटक केली असून, अन्य दोघा फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
आरोपींमध्ये हिना राजू सय्यद (वय ३८, रा. श्रीरामपूर) व तिचा भाऊ जाबीर रशीद शेख (३२, रा. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. गुन्ह्यातील गौसखाँ हनिफखाँ पठाण उर्फ गौश्या व इरफान इब्राहिम पठाण (दोघेही रा. गराडा, ता. कन्नड) हे दोघे आरोपी फरार झाले आहेत.
शहर पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुंजे, निरीक्षक हर्षवर्धन गवळी, उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी तपासाची माहिती दिली.
आरोपी हिना राजू सय्यद ही डॉ. ब्रम्हे यांच्या घरी गेली १० वर्षे मोलकरीण म्हणून काम करत होती. तिला घरातील सर्व गोष्टींची बारकाईने माहिती होती. चोरीच्या घटनेपूर्वी पाच ते सहा महिनेअगोदर तिने काम सोडले होते. त्यानंतर ३० ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटे तोंडाला कापड बांधलेल्या तिघा चोरट्यांनी शिडीच्या मदतीने घरावरील जाळी तोडून आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी मुलाच्या खोलीला बाहेरून कडी लावली व डॉक्टरांचे तोंड दाबत आवाज केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांचे हातपाय बांधत कटावणीच्या मदतीने कपाट तोडून त्यातील ४० लाख रुपयांची रक्कम लूटली होती. डॉक्टरांच्या पत्नीचे १४ तोळ्यांचा सात लाख रुपये किमतीचा सोन्याचा हारदेखील त्यांनी लूटला होता.असा लागला छडा
पोलिसांनी डॉ. ब्रम्हे यांच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रण तपासले. त्यात आरोपींची दुचाकी दिसून आली. नेवासा मार्गावरील अशोकनगर फाट्यापर्यंत दुचाकी सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यावरून पोलिसांचे आरोपींवर लक्ष होते. आरोपींचे मोबाइल कॉल पोलिसांनी तपासले. त्यावरून आरोपींची माहिती समोर आली.१२ लाखांसह इतर मुद्देमाल जप्त
गुन्ह्यात लुटण्यात आलेल्या ४० लाख रुपयांमधील १२ लाख रुपये रोख रक्कम पोलिसांनी आरोपींकडून जप्त केली. याशिवाय आरोपींनी चोरीच्या पैशातून खरेदी केलेले ६६ हजार रुपये सोन्याचे नेकलेस, १ लाख ३५ हजार रुपयांची मोटारसायकल, ९६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व १४ हजार रुपयांची चांदी, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.