कर्जत : आमदार रोहित पवार यांच्या नावावर शेतक-यांची लूट ही बातमी मंगळवारी (२३ जून) ‘लोकमत’ने प्रकाशित केली. या बातमीमुळे कर्जत तालुक्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान, मिरजगाव येथील शासकीय हमीभाव मका, ज्वारी खरेदी केंद्र मंगळवारपासून बंद करण्यात आले आहे. यामुळे हा विषय आणखीच चर्चेत आला आहे.
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे शासनमान्य मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. हे केंद्र कर्जतकर फार्मर प्रोड्यूसर कंपनी चालवत होती. या खरेदी केंद्रावर मात्र मध्येच प्रती किलो एक रूपया खर्च आमदार रोहित पवार यांच्या नावाने शेतकºयांच्या माथी मारला जात होता. ही बाब धांडेवाडी येथील शेतकरी महेंद्र धांडे यांनी उघड केली. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे रितसर तक्रार केली आहे. या बाबत ‘लोकमत’ने आवाज उठवला.
आमदार पवार यांनी मिरजगाव येथील मका खरेदी केंद्राला २० जून रोजी भेट दिली होती. यावेळी त्यांनी येथील शेतकºयांशी संवाद साधून अडीअडचणींबाबत चर्चा केली होती. याबाबत आमदार पवार यांनी केंद्राच्या चौकशीच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, मिरजगाव येथे शासकीय हमीभाव मका खरेदी केंद्र सुरू होते. मात्र या केंद्राची मका खरेदी करण्याची क्षमता संपली आहे. यामुळे मिरजगाव येथील शासकीय हमीभाव मका खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे, असे मका खरेदी केंद्र चालक विजय नेटके यांनी सांगितले.