- साहेबराव नरसाळेअहमदनगर - नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नगरजवळील शेंडी परिसरात छापा टाकून बांधकाम विभागातील एका क्लास वन अधिकाऱ्याला मोठी रक्कम लाच स्वरूपात स्वीकारताना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती शुक्रवारी (दि. ३) रात्री उशिरा मिळाली. मात्र, याबाबत अधिकृत दुजाेरा मिळाला नव्हता. रात्री उशिरा एमआयडीसी येथे लाचलुचपतचे एक पथक दाखल झाले होते.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका तक्रारदाराने लाचेसंदर्भात तक्रार केली होती. यावरून नाशिक लाचलुचपत विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिठा वालावलकर यांचे पथक नगरमध्ये दाखल झाले. या पथकासोबत वालावलकर या रात्री उशिरापर्यंत शासकीय विश्रामगृहावर थांबून होत्या. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप हेदेखील यावेळी उपस्थित होते.
एसीबीच्या पथकाने बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याला अहमदनगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेंडी बायपास येथून ताब्यात घेतले. सुमारे ७५ लाख ते एक कोटीच्या दरम्यान त्याच्याकडे रक्कम सापडल्याची प्राथमिक माहिती मिळाली. यामध्ये आणखी काही अधिकारी सामील असण्याची शक्यता असून, या अधिकाऱ्यांना अटक करण्यासाठी नाशिक एसीबीचे चार ते पाच पथके रवाना झाली होती; परंतु, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून दिली गेली नाही. या घटनेचा पंचनामा करून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची तयारी रात्री उशिरा सुरू होती. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक विश्वास नांगरे पाटील हेदेखील या गुन्ह्यावर बारकाईने लक्ष ठेवून होते. शनिवारी ते यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले.