अहमदनगर : देशात सध्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून चांगले काम सुरु आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्हा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्व यंत्रणांसह जिल्ह्यातील नागरिकांचा सक्रिय सहभाग हवा, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या वतीने आयोजित ‘स्वच्छता ही सेवा पंधरवाडा’ उपक्रमाचा समारोप आणि स्वच्छता सर्वेक्षणाचा शुभारंभ पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अभय आगरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, उपायुक्त प्रदीप पठारे आदी यावेळी उपस्थित होते. हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत स्वच्छता पंधरवाड्या’चा समारोप करण्यात आला.पालकमंत्री शिंदे म्हणाले, स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छतेबाबत जनजागृती सुरु केली आहे. देशात पाचशे शहरांचे नामांकन करण्यात आले असून स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या शहरांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. आपले शहर स्वच्छ व सुंदर असावे, यासाठी प्रत्येकजण काम करतो आहे. अशावेळी अहमदनगर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनीही पुढाकार घेऊन स्वच्छता उपक्रमात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे. तरच आपण देशातील इतर शहरांच्या तुलनेत अव्वल स्थानावर येऊ.पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी यावेळी उपस्थित सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. गांधी जयंतीनिमित्त वाडिया पार्क येथील महात्मा गांधी पुतळ्यास सर्वांनी अभिवादन केले. तसेच त्यांच्या हस्ते नारायण बुरा, संतोष गायकवाड, गणेश भुताणे, अनिल पाटोळे आदींचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी, स्वच्छता ही सेवा असल्याचे सांगून आपल्या शहरासाठी प्रत्येकाने यात योगदान द्यावे, असे सांगितले. सन २०१४ मध्ये हे अभियान सुरु करण्यात आले. आता हे अभियान महत्वाच्या टप्प्यावर आले असून स्वच्छ सर्वेक्षणात २०१९ मध्ये शहर व जिल्हा अग्रेसर राहावा, यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.महापौर सुरेखा कदम यांनी शहर स्वच्छतेच्या माध्यमातून शहर सुंदर होत असल्याचे सांगितले. या उपक्रमात नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढत आहे. यापुढील काळात तो अधिक वाढेल आणि हे अभियान गती घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा लोगो क्रीडा संकुलावर साकारण्यात आला.