टाकळी ढोकेश्वर : ज्या ज्या ठिकाणी वनाच्छादित परिसर आहे, तेथे पाऊस चांगला पडतो आणि पर्यावरण चांगले राहते. त्यामुळे जिल्ह्यात लोकसहभागाने अधिकाधिक संख्येने वृक्षारोपण करुन जिल्हा हिरवागार करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.राज्यातील वनआच्छादन वाढविण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या ५० कोटी वृक्षलागवड मोहिमेत यावर्षी राज्यभरात १३ कोटी वृक्षलागवड केली जाणार आहे. या वृक्षलागवड मोहिमेचा जिल्ह्यातील शुभारंभ पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळा येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आदर्श गाव समितीचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपवनसंरक्षक एम. आदर्श रेड्डी, विभागीय वनाधिकारी कीर्ति जमदाडे-कोकाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, विश्वनाथ कोरडे, राजेंद्र कोरडे, वसंतराव चेडे, तहसीलदार भारती सागरे, तहसीलदार विशाल तनपुरे, सरपंच छाया शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती. मुख्य कार्यक्रमानंतर टाकळी ढोकेश्वर शिवार आणि धोत्रे शिवारातही पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. स्थानिक नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनीही प्रा. शिंदे यांच्यासह सावताळा वनक्षेत्रावर वृक्षारोपण केले.पालकमंत्री म्हणाले, १ ते ३१ जुलै या कालावधीत होणाऱ्या वृक्षलागवड मोहिमेचे नियोजन वर्षभरापासून सुरु आहे. जिल्ह्यातही ४९ लाख ९४ हजार रोपांची लागवड होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. राज्याचे वन आच्छादन वाढविण्यासाठी वृक्षलागवडीचा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.प्रत्येक गावालगतचे मोकळे डोंगर, टेकड्या, परिसर हिरवागार करावा आणि पर्यावरण रक्षणासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.पवार म्हणाले, वनव्यवस्थापन समित्यांमार्फत राज्यात चांगले काम होत आहे. त्यातही आपला अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. जलसंधारण कामे चांगल्या प्रमाणात झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियान ही आपल्या राज्याने देशाला दिलेली देणगी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्ह्यातील उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, ग्रामपंचायत आणि इतर शासकीय यंत्रणा वृक्षलागवड करण्याचे नियोजन या मोहिमेत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना, शाळा-महाविद्यालये, विविध औद्योगिक आस्थापना, व्यापारी संस्था, असोसिएशन्स यांनीही शासनाच्या या कामात लोकसहभाग दिला आहे. विविध ठिकाणी त्यांच्या वतीनेही वृक्षलागवड मोहिम राबविण्यात येणार, असे रेड्डी यांनी सांगितले.