अहमदनगर: मी महाराष्ट्राचा असल्याने नवी दिल्लीत महाराष्ट्राचेच प्रतिनिधीत्त्व करतो. इथल्या संत-महापुरुषांच्या विचारांचा वारसा मला मिळालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नेहमीच विकासात देशात एक क्रमांकावर असावा, अशीच इच्छा आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आता उसापासून साखर निर्मिती बंद करा, तर त्याऐवजी इथेनॉल निर्मिती करा, असे आवाहन त्यांनी केले.
अहमदनगर येथे चार महामार्गांचे भूमिपूजन व चार महामार्गांचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे शोषण करू नये. केवळ उसापासून नव्हे तर तांदुळ, मका व इतर धान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. ब्राझिलच्या धर्तीवर इलेक्ट्रीक व इथेनॉलवर वाहने चालविण्याची गरज आहे. साखरेचे रुपांतर आता इथेनॉलमध्ये करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. मी पेट्रोलच्या गाडीत नव्हे तर इथेनॉलच्याच गाडीत बसेल, अशी प्रतिज्ञा आता शेतकऱ्यांनी करायला हवी आहे.
गडकरी म्हणाले, भूक, गरिबी, शेतकरी, रोजगार निर्मिती, वॉटर, पॉवर, वाहतूक यामध्ये आता विकसित व्हावे लागेल. रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत झाली. म्हणून देशात रस्ते करीत आहे. महाराष्ट्र सरकारने जागा दिल्या तर अनेक उद्योग महाराष्ट्रात उभे करण्याचे नियोजन असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
यावेळी शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांना आता साखर उत्पादनावर नव्हे तर इथेनॉल निर्मितीवर अवलंबून रहावे लागेल. आता साखर एके साखर असे करून चालणार नाही. तर इथेनॉल आणि त्याहीपुढे जावे लागेल. विकासाचा वास्तव दृष्टिकोन गडकरी यांच्याकडे असल्याचे गौरवोद्वागरही पवार यांनी काढले.
खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले, काही रस्त्यांचे ठेकेदार पळून गेले आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्गांचे काम नगर जिल्ह्यात प्रगतीपथावर आहे. देशात अहमदनगरमधील विकास कामात एक नंबर आहे. शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्या माध्यमातून राज्याचा-देशाचा विकास होईल, अशी खात्री आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले. पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी शहरातून जाणाऱ्या रस्त्यांच्या मजबुतीकरण करण्याची मागणी केली.