राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व पाणी फौंडेशन यांच्यात कृषि तंत्रज्ञानावर चित्रफिती बनविण्यासाठी गुरुवारी (दि.१६ जुलै) आॅनलाईन सामंजस्य करार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा होते. या सामंजस्य करारावर कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी सही केली. पाणी फौंडेशनच्या वतीने रिना दत्ता यांनी स्वाक्षरी केली.
कृषि विद्यापीठाने आतापर्यंत विविध पिकांमध्ये संशोधन करुन निर्माण केलेले वाण, तंत्रज्ञान, कास्ट प्रकल्पाच्या माध्यमातून विकसीत झालेले फुले इरिगेशन शेड्युलर, मोबाईल अॅप या सामंजस्य कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतक-यांपर्यंत पोहोचेल, असे डॉ. विश्वनाथा यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी पाणी फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सत्यजीत भटकळ, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, हळगाव कृषि महाविद्यालयाचे नोडल अधिकारी डॉ. मिलिंद अहिरे, सर्व विभाग प्रमुख, प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे उपस्थित होते.