कोपरगाव : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी किमान आपली स्वाक्षरी मराठीत करावी. कारण ती आपल्या मनाचा आरसा असते. त्यामुळे आपल्या मातृभाषेची आपणास सतत आठवण राहील. नंतर त्याला विशाल स्वरूप येऊन मराठी अधिक समृद्ध होईल, असे आवाहन सुप्रसिद्ध कवी, चित्रकार संतोष तांदळे यांनी केले.
कोपरगाव येथील के. जे. सोमैया महाविद्यालयामध्ये नुकताच मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तांदळे बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. आर. पगारे होते. तांदळे म्हणाले, कोणत्याही व्यक्तीच्या रक्तात मातृभाषा ही असतेच. त्याच भाषेतून आपल्याला उत्तमपणे व्यक्त होता येते. त्यासाठीचे पेन व कागद हे साधन आपल्याकडे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सतत व्यक्त होत राहिले पाहिजे. आजची पिढी फेसबुक, व्हाॅट्सॲप, ट्विटर यांच्या जाळ्यात अडकली आहे. त्यातून बाहेर पडून सातत्याने प्रत्यक्ष पुस्तकाचे वाचन केले पाहिजे. कारण महाविद्यालयीन काळात केलेले वाचन हे आपणास संस्कारसंपन्न करतेच, पण ती जीवनभर पुरेल अशी ती शिदोरी असते. मराठी विभागप्रमुख डॉ. गणेश देशमुख यांनी प्रास्ताविक केले. हिंदी विभागप्रमुख डॉ. संजय दवंगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जे. एस. मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी विभागातील डॉ. विठ्ठल लंगोटे, विद्यार्थी नीलेश सेवक, कानिफनाथ थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले.