घोडेगाव : येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवी मंदिरात बसवलेले सतरा किलो चांदीचे मखर बुधवारी (१८ नोहेंबर) रात्री चोरी झाले. त्याचा तपास बारा दिवस उलटुनही लागलेला नाही. या चोरीचा तातडीने तपास लावावा, या मागणीसाठी संतप्त घोडेगाव ग्रामस्थ व देवी भक्तांनी स्वयंस्फूर्तीने मंगळवारी सकाळी १० वाजता रास्ता रोको व गावबंद आंदोलन केले.
चोरी प्रकरणातील आरोपीस तत्काळ अटक करावी. सतरा किलो चांदीचे नक्षीकाम असणारे मखर पूर्ववत देवीस बसवावे, या मागणीसाठी सकाळी दहा ते दहा पंचवीस असे पंचवीस मिनिटे रास्ता रोको आंदोलन केले. मंगळवारी सकाळपासून अकरा वाजेपर्यंत गाव बंद ठेवण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी सातशे ते आठशे सह्याचे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले.
रास्तारोको दरम्यान नगर-औरंगाबाद रस्त्यावर दुतर्फा तीन चार किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. यामधे प्रथमच महिलाचा लक्षणीय सहभाग जाणवला. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. भाषणबाजी टाळून शांततेच्या मार्गाने पंचवीस मिनिटात रास्ता रोको आटोपला.
आंदोलनकर्त्यांच्या निवेदनाला उत्तर देताना शेवगावचे डि.वाय.एस.पी. सुदर्शन मुंढे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी सोनई पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, शिंगणापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागूल व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.