अशोक निमोणकर ।
जामखेड : तालुक्यातील ५९ दुकाने वैयक्तिक स्वरुपाची आहेत. त्यातील निम्मे म्हणजे २९ दुकाने महिलांच्या नावावर आहेत. या दुकानांवरही पुरुषांचीच मुक्तेदारी आहे. महिला बचत गटांना दिलेली २१ दुकानेही अन्य व्यक्तींकडूनच चालविली जात आहेत. सरकारने गोर-गरिबांसाठी दिलेली स्वस्त धान्य अशा वेगवेगळ््या प्रकारे फस्त करण्याचेच उद्योग सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून आढळून आले आहे.
तालुक्यातील दीड लाख लोकसंख्येला १०३ स्वस्त धान्य दुकानामार्फत आठ हजार क्विंटल धान्य वाटप केले जात आहे. पॉस मशीनद्वारे धान्य वाटप केले जात असल्यामुळे काळाबाजार कमी झाला आहे. मात्र त्यातही दुकानदार अनेक पळवाटा शोधत आहेत. मागील दोन महिन्यात तीन दुकानांवर अफरातफर केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. यातील दोन जणांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.
शासनाने गोरगरिब जनता उपाशीपोटी राहू नये म्हणून स्वस्त दरात गहू, तांदूळ देण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार त्यांच्या उत्पन्नानुसार अंत्योदय, प्राधान्य व केशरी शिधापत्रिका असे वर्गीकरण करून माणसी धान्य दर ठरवून दिले आहेत. त्यानुसार तालुक्यात प्राधान्य कार्ड २५ हजार २८१ इतके आहेत. या अंतर्गत १ लाख २६१ लाभार्थ्यांना माणसी ५ किलो प्रमाणे गहू दोन रुपये व तांदूळ तीन रुपये दराने दिला जातो. यासाठी दर महिन्याला गहू २८७३ क्विंटल व तांदूळ १८३३ क्विंटल धान्य दुकानदारांना पोहच केला जातो.
तालुक्यात अंत्योदय योजनेतंर्गत ५ हजार ५०० शिधापत्रिका धारक आहेत. लाभार्थी संख्या २९ हजार ५९ आहे. यासाठी १३५६ क्विंटल गहू व ५४५. ५० क्विंटल तांदूळ व १४५ क्विंटल साखर दर महिन्याला मिळते. गहू २५ किलो व तांदूळ १० किलो दिला जातो. तसेच साखर माणसी १ किलो दिली जाते. तर केशरी शिधापत्रिका संख्या ५ हजार २५२ असून १९ हजार ३३ लोकसंख्या करीता ५७८ क्विंटल गहू, ३८९.५० क्विंटल तांदूळ माणसी गहू तीन किलो आठ रुपये दर व तांदूळ दोन किलो १२ रुपये दराने दिला जातो. पांढ-या शिधापत्रिका बाराशेच्या आसपास असून त्याची लोकसंख्या दहा हजाराच्यावर आहे.
दुकानदारांवर फौजदारी गुन्हे दाखलमागील दोन महिन्यात तालुक्यातील सोनेगाव, राजुरी व पांढरेवाडी येथील धान्य दुकानदारांनी अफरातफर केल्याचे प्रकरण समोर आले आहे. तालुका पुरवठा अधिकारी रवींद्र बोरकर यांनी सोनेगाव व पांढरेवाडी येथील दुकानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. यातील सोनेगाव येथील दुकानदार तालुक्यातील अनेक धान्य दुकानदारांशी सलगी साधून आहेत. याबाबत मोठे रॅकेट कार्यरत आहे. त्याचे धागेदोरे सोलापूरपर्यंत आहेत. याबाबत सध्या तपास सुरू आहे.