अहमदनगर: श्री गणेशाची धुमधडाक्यात प्रतिष्ठापना केल्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळे आता आरास खुली करण्याच्या तयारीला लागले आहेत. माळीवाडा व नंदनवन तरुण मंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत डी.जे. न लावण्याचा निर्णय घेतला असून रविवारी संध्याकाळी आरास खुली केली जाणार असल्याचे मनसेचे नेते, मंडळाचे अध्यक्ष दत्ता जाधव यांनी सांगितले. माळीवाडा तरुण मंडळास ऐतिहासिक परंपरा असून यंदा सूर्यपुत्र शनिदेव हा भव्य देखावा साकारण्याचे काम सुरू आहे. हे मंडळ दरवर्षी धार्मिक, पौराणिक देखावे तयार करून गणेशभक्तांची मने जिंकत असते. आजपर्यंत विविध देखावे सादर करून मंडळाने अनेक पारितोषिके संपादन केली आहेत. देखाव्यासोबतच यंदा सामाजिक कार्यक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जाधव म्हणाले. मंडळाने वर्षभरात धार्मिक सप्ताह, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, नेत्र तपासणी शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना मदत, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, महिलांसाठी रांगोळी व मेहंदी स्पर्धेचे आयोजन केले होते. टिळक रस्त्यावरील नंदनवन मित्र मंडळ यंदा साईबाबा भंडारा हा धार्मिक देखावा तयार करत आहे. हा देखावाही रविवारी संध्याकाळी खुला होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष दत्ता जाधव यांनी सांगितले. पर्यावरण व ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी मंडळाने यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डी.जे. न लावण्याचा निर्णय घेतला आहे. माळीवाडा व नंदनवन तरुण मंडळ या दोन्ही मंडळाचे अध्यक्ष दत्ता जाधव हेच आहेत. दोन्ही मंडळाने यंदा ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. रुद्रनाथ ढोल पथकाच्या निनादात विसर्जन मिरवणूक निघणार आहे. (प्रतिनिधी)
माळीवाडा, नंदनवन तरुण मंडळाचा डी.जे.ला बायबाय
By admin | Published: August 29, 2014 11:30 PM