लोकमत न्यूज नेटवर्कसंगमनेर : कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी संगमनेरातील मालपाणी परिवाराच्या वतीने सव्वा कोटीची भरीव मदत करण्यात आली. संगमनेर सहाय्यता निधीला पाच लाखांचा धनादेश दिला. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री सहायता निधी व पंतप्रधान केअर फंडासाठी प्रत्येकी पन्नास लाख रुपये असा एकूण एक कोटी रूपयांचा धनादेश मालपाणी उद्योग समूहाचे संचालक राजेश मालपाणी व मनीष मालपाणी यांनी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्याकडे सुपूर्द केला.जनकल्याण समितीला अकरा लाख, ग्रामीण रूग्णालयांतील सुविधांसाठी पाच लाख, संगमनेरच्या कुटीर रुग्णालयाला एक लाख, लायन्स क्लब संगमनेर सफायरच्यावतीने कोरोनाग्रस्त भोजन सेवेसाठी दोन लाख व शहरातील औषध फवारणीसाठी एक लाख असा एकूण सव्वाकोटीचा निधी देवून मालपाणी परिवाराने आपली समाजिक बांधिलकी पुन्हा जपली आहे. देशभरातील उद्योग व्यवसाय बंद आहेत. केंद्र व राज्य सरकार यांना करूरूपी मिळणाऱ्या रक्कमेचा ओघ कमी झाला आहे. अशा अवस्थेत देशात व राज्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होते आहे. तपासणी, उपचार यावर खर्च करण्यासाठी कोट्यवधी रूपयांची गरज निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान केअरसाठी, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. त्याला मालपाणी परिवाराने साथ देत केंद्र व राज्य सरकारसह स्थानिक सहाय्यता निधी, ग्रामीण रुग्णालये, संगमनेरचे ग्रामीण रूग्णालय अशा सर्वांनाच मदतीचा हात देत कोरोना विरोधातील लढ्यातही आघाडीवर असल्याचे दाखवून दिले आहे.
मालपाणी परिवाराची सव्वा कोटीची मदत,कोरोनाविरुद्धची लढाई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पंतप्रधान केअर फंडासाठी प्रत्येकी पन्नास लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:33 AM