संगमनेर : यंदाच्या नीट परीक्षेत मोठा गैरप्रकार झाला आहे. ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, तेथील विद्यार्थ्यांना ग्रेसमार्क देण्यात आले. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला. या मागणीचे निवेदन गुरुवारी (दि.२०) संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांना देण्यात आले. नीट परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराचा संगमनेरात युवक काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केली आहे.
काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयात संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी विविध परीक्षांमध्ये झालेला गोंधळ, नीट परीक्षेतील गैरप्रकार, नुकतीच रद्द झालेली यूजीसीची-नेट परीक्षा, याचबरोबर पोलीस भरती आणि इतर परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार बाबत युवक-युवती, तरुण-तरुणींनी तसेच त्यांच्या पालकांनी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर चर्चा होऊन उपविभागाचे उपविभागीय अधिकारी हिंगे यांना निवेदन देण्यात आले.