लोकमत न्यूज नेटवर्क पाथर्डी (अहमदनगर): पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र भगवान गडावर दोन लाख भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावत पांडुरंगासह व भगवान बाबा समाधीचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीनिमित्त भगवान गड संस्थांनच्या वतीने पांडुरंगाच्या मूर्र्तीचा महाभिषेक व भगवान बाबांच्या समाधीचे पूजन व आरती सोहळा पार पडला.
सकाळ पासूनच दर्शन रांगा लागल्या होत्या. हजारो भाविक रात्री उशीरापर्यंत रांगेत दर्शन घेत होते. नगर, बीड, गेवराई, औरंगाबाद भागातील भाविक मोठ्या संखेने उपस्थित होते. आषाढी एकादशीनिमित्त येणा-या भाविकांना फराळाची व्यवस्था भारजवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते. दुपारपर्यंत ४५ क्विंटल व दुपारनंतर १०० क्विंटल शाबूदाणा तयार करण्यात आला होता. संस्थानचे मंहत नामदेव शास्त्री यांनी चोख स्वयंसेवक व्यवस्थेसह महाप्रसादाचे नियोजन केले होते. अनेक गावागावातून पायी दिंडी काढून हरिनामाचा गजर करत भगवान गडावर भाविक दाखल होत होते. गरर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.