संगमनेर : गेल्या तीन दिवसांपासून हरिचंद्रगड परीसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मूळा नदीला पूर आला असून बुधवारी मांडवे पूल पाण्याखाली गेल्याने साकुरचा संपर्क तुटला. याबाबत वृत्त असे, अकोले तालुक्यातील पश्चिम पट्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून तुफान पाऊस पडत आहे. हरिश्चंद्रगड परिसरात रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने ओढे-नाले भरभरून वाहू लागले आहे. परिणामी मुळा नदीला पूर आला आहे. आंबित धरण ओव्हफ्लो झाल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. बुधवारी मुळा नदीच्या पातळीत कमालीची वाढ झाली. मांडवे येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. साकुर गावचा पारनेर व नगरशी संपर्क तुटला. नदीला आलेले पाणी बघण्यासाठी बघ्यांची झुंबड उडाली होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचा जोर आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
मांडवे पूल पाण्याखाली
By admin | Published: July 30, 2014 11:26 PM