राजूर : अकोले तालुक्यातील मुळा खो-यातील आंबित लघु पाटबंधारे तलाव मंगळवारी पहाटे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. त्यामुळे १५० क्युसेकने पाणी मुळा नदीपात्रात झेपावले आहे.
हरिश्चंद्रगडाच्या पर्वत रांगांतील कुमशेतच्या आजोबा पर्वतात उगम पावणा-या मुळा नदीचा प्रवाह आंबित गावाच्या वरील बाजूला पाटबंधारे विभागाच्या वतीने दगडी तलाव बांधला आहे. पावसाळ्यात पहिल्याच पावसात दरवर्षी आंबित येथील लघु पाटबंधारे तलाव सुरवातीला भरून वाहू लागतो.
यावर्षी निसर्ग चक्री वादळ सोबतीला पाऊस घेऊन आले. सलग तीन दिवस झालेल्या जोरदार पावसाने आणि त्यानंतरही सातत्याने येत असणा-या पावसाच्या सरींनी १९३ दशलक्ष घनफुट क्षमतेचे आंबित धरण मंगळवारी पहाटे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले.
धरणाच्या भिंतीवरून दीडशे क्युसेकने पाणी मुळा नदीपात्रात पडत असल्याचे जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितले. सोमवारपासून या परिसरात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे.