राहुरी : मुंबईवरून निघालेला एक वृद्ध मनमाड येथे रेल्वेने पोहोचला. पण लॉकडाऊन लागल्यामुळे मनमाडवरून तिसगाव (ता. पाथर्डी) येथे जाण्यासाठी वाहन मिळाले नाही. त्यामुळे पायी प्रवास सुरु केला. देसवंडी (ता. राहुरी) येथे पाहुण्यांकडे गेलेल्या वृद्धाला घरात प्रवेश न दिल्याने राहुरी गाठावी लागली. सोमवारी रात्री संत गाडगे बाबा आश्रम शाळेत मुक्काम करुन पुन्हा तिसगावकडे प्रयाण करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे जॉन वसंत खंडागळे.जॉन खंडागळे मुंबई येथे मुलगा व सुनेकडे राहत होते. गावी तिसगाव येथे जाण्यासाठी मुंबई ते मनमाड असा रेल्वेने प्रवास केला. मनमाडला आल्यानंतर तिसगावकडे जाण्यासाठी साधन नव्हते. त्यामुळे खंडागळे यांनी पायी प्रवास करत गावी जाण्याचा निर्णय घेतला. राहुरी तालुक्यात आल्यानंतर देसवंडी येथील पाहुण्यांकडे मुक्कामाला जाण्याचा निर्णय घेतला. खंडागळे यांना बघताच पाहुण्यांनी हातांनी खुणावत येथून लवकर निघून जा, असा इशारा केला. प्रवास करून थकलेल्या वृद्धास मुक्काम कोठे करावा, असा प्रश्न होता. पाहुण्यांच्या घराचा दरवाजा बंद झाल्यावर रात्री देसवंडी ते राहुरी असा प्रवास केला. इथे मुक्कामाची व्यवस्था कुठे होईल, असे एका व्यक्तीला विचारले. बंधित व्यक्तीने संत गाडगे बाबा आश्रम शाळेचे नाव सांगितले.जॉन खंडागळे यांनी रात्री संत गाडगेबाबा आश्रम शाळा गाठली. शाळेत राहण्याची व जेवणाची सोय झाली. साधन न मिळाल्याने पायी प्रवास करावा लागला़ प्रवासात कोणीही आपल्याला त्रास दिला नाही. राहुरीत आल्यानंतर नाकाला रुमाल लावण्याची सूचना केली. त्यानंतर नाकाला रुमाल बांधला.
प्रवासात अनेकांची मदत
जॉन खंडागळे लॉकडाऊन लागण्यापूर्वी मनमाडमध्ये पोहोचले होते. मनमाडमध्ये आल्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे त्यांना तिसगावला येण्यासाठी वाहन मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी पायी प्रवास सुरु केला. प्रवासात त्यांना अनेकांनी मदत केली. मिळेल तिथे आसारा घेत ते राहुरीपर्यंत पोहोचले. राहुरीत आल्यानंतर त्यांनी तोंडावर रुमाल बांधून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेतली.
आपल्याला गावाकडे जाण्याची ओढ लागली आहे. शहरापेक्षा आपला गावच बरा. लवकरच मी माझ्या शेतात जाणार आहे. वांबोरीत एक मुक्काम करून मग गावी तिसगावला पोहोचेल.- जॉन खंडागळे, पायी प्रवास करणारा वृद्ध