कोपरगाव : गेल्या आठवडाभरापासून शहरासह तालुक्यात मोठी रुग्णवाढ होत आहे. बुधवारी एकाच दिवशी तब्बल ११७ बाधित रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यातील बाधित रुग्णाची संख्या ३२० इतकी झाली आहे.
शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोडावली होती, परंतु मार्च महिन्यात गेल्या काही दिवसांत सततची रुग्ण वाढ होत असल्याने प्रशासनाने मंगळवारपासून १५० बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. बुधवारी नगर येथील अहवालात ३६, रेपिड अँटिजन तपासणीत ७, खासगी लॅब अहवालात ७४ असे एकूण तब्बल ११७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधित रुग्णांचा आकडा ३२० वर गेला असून, दिवसागणिक होणारी रुग्णवाढ कोपरगावकरांसाठी चिंता वाढविणारी ठरत आहे. ८५ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविले आहेत, तर ३३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
दरम्यान, अशाच पद्धतीने रुग्णवाढ सुरू राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शंका वर्तविली जात आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णवाढीवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.