संगमनेर : आॅक्टोबर महिन्यातील २१ तारखेला राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्ष तयार असून आर्थिक मंदी, बेरोजगारीसह शेतक-यांचे प्रश्न घेऊन आम्ही मैदानात उतरणार आहोत. राज्यातील अनेक नेते कॉँग्रेसच्या संपर्कात असून अनेक जण पक्षात प्रवेश करणार आहेत. लवकरच पहिली यादी जाहीर करणार आहे, असे कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी शनिवारी संगमनेरात पत्रकारांशी संवाद साधला. थोरात पुढे म्हणाले, गेली पाच वर्ष राज्यात कॉँग्रेसचे काम सातत्याने सुरू होते. आम्ही दोनदा यात्रा काढल्या. अनेक प्रश्नांवरून आंदोलने केली. या सरकारकडे एक अपयशी सरकार म्हणून पाहिले जाते आहे. राज्यातील शेतक-यांचे प्रश्न तसेच आहेत. बेरोजगारी देखील वाढली आहे. अशा अनेक बाबींमुळे या सरकारबद्दल नाराजीचा सुरू आहे. त्यामुळे राज्यातील जनता आमच्यासोबत आहे. कॉँग्रेस सोडून अनेक जण गेले. कालपर्यंत पक्षात येणा-यांचा आमच्याशी संपर्क नव्हता. मात्र, आज सकाळपासून अनेकांचे फोन येत आहेत. शिवसेना-भाजप युती होवो अथवा ना होवो. कॉँग्रेस-राष्टवादी कॉँग्रेस एकत्र निवडणूक लढविण्यास तयार आहे. युती झाली अथवा नाही. त्याचा आम्हांला काय फायदा होईल. याचा आम्ही विचार करत नाही. शिवसेना काहीही सहन करायला तयार असल्याचे चित्र आहे. शिवसेना बॅकफूटवर गेल्याचे दिसत असून हे त्यांच्यासाठी चांगले नाही. असेही कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले.
राज्यातील अनेक नेते कॉँग्रेसच्या संपर्कात-थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 1:30 PM