श्रीरामपूर : आंबट शौकीनांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना निर्जनस्थळी बोलवून लुटणाऱ्या टोळीतील सात सदस्यांना पोलिसांनी गजाआड केले. जिल्ह्यात त्यांनी अनेकांना ठगविले असले तरी बदनाम होण्याच्या भीतीने कुणीही पोलिसांसमोर आले नव्हते. अखेर एका प्राध्यापकास श्रीरामपूर शहरात टोळीने हिसका दाखविल्याने हा प्रकार समोर आला आहे.आरोपींमध्ये टोळी प्रमुख राजन अशोक ब्राम्हणे (वय ३०, सोनगाव सात्रळ, राहुरी), प्रियंका मारुती कांगणे (वय २०, खळीपिंप्री, ता. संगमनेर), सागर रावसाहेब राक्षे (वय २३, लोणी खुर्द), ओंकार कान्हू गिते (वय २१, आश्वी खुर्द, ता. संगमनेर), किशोर शामराव भोसले (वय २६, हनुमंतगाव, ता. राहाता), गणेश शंकर रोकडे (वय २२, कोल्हार, ता.राहाता), संगीता प्रल्हाद पवार (वय २६, साई मंदिराजवळ, संगमनेर) यांचा समावेश आहे. आरोपींना सोनगाव, रांजणगाव (पुणे), संगमनेर येथून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघा जणांचा पोलीस शोध घेत आहेत. या कामी सायबर सेलची मदत झाली.अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कारवाईची माहिती दिली. यावेळी उपअधीक्षक राहुल मदने, निरीक्षक श्रीहरी बहिरट यावेळी उपस्थित होते. कोपरगाव येथे मोठ्या शिक्षण संस्थेत नोकरीस असलेल्या देवळाली प्रवरा येथील प्राध्यापकास या टोळीने सोमवारी (दि.१८) रात्री नऊ वाजेच्या दरम्यान लुटले. आरोपी प्रियंका हिने रोशनी गायकवाड या खोट्या नावाने त्यास शरीरसुखाकरिता येथे बोलविण्यात आले होते. आठ दिवसांपूर्वीच त्यास संपर्क करण्यात आला होता. ठरल्यानुसार प्रियंका ही प्राध्यापकाच्या कारमध्ये बसली. मात्र, येथील नेवासे रस्त्यावरील रेल्वे स्थानक पुलाजवळ गेले असता टोळीतील सदस्यांनी त्यास अडवून लुटले. आरोपींनी कार (एमएच ०४ जीडी ५२१९) व मोटारसायकलचा (एमएच १२ बीआर २३४२)चा वापर केला. टोळीने प्राध्यापकाकडील अठराशे रुपये व पांढºया रंगाची इंडिगो कार (एमएच १६ एबी ३६४५) ही चोरून नेली. त्यानंतर या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.मुलीसोबत अश्लील छायाचित्रे काढून अनेकांकडून पैैसे उकळण्याचे प्रकार या टोळीने केले. शिर्डी व लोणीमध्ये त्यांनी हे प्रकार केले. मात्र, बदनामीच्या भितीने फिर्याद देण्याची कुणी धाडस केले नाही. टोळीप्रमुख राजन ब्राम्हणे याने काही गुन्ह्यात स्वत:ची कार पुरविली आहे. सागर राक्षे याच्यावर आर्म अॅक्टखाली नगरला गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.