लोणी : छत्रपती संभाजी महाराजांनी नवीन पक्ष काढण्याच्या संदर्भात सुतोवाच केले असले तरी, आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजून आपली भूमिका उभी केलेली नाही. आरक्षणाचा अंतीम निर्णय आणि आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी सर्व संघटनांना एकत्रित येवून, सरकारवर दबाव आणावा लागेल असे स्पष्ट मत माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.
विखे म्हणाले, आरक्षणाच्या संदर्भात छत्रपती संभाजी महाराजांनी मांडलेली भूमिका ही मराठा समाजाच्या हिताचीच आहे. पण सरकारला केवळ अल्टीमेटम न देता सर्व मराठा संघटनांना सोबत घेवून भूमिका मांडण्याची गरज असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. मराठा आरक्षण देण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. केवळ अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखविण्यात आघाडी सरकार स्वत:चा वेळ वाया घालवत आहेत. सरकार मधील मंत्र्यांची वेगवेगळी वक्तव्य पाहील्यास आरक्षणाच्या संदर्भात आघाडी सरकारचा हेतू प्रामाणिक नसल्याची टिका त्यांनी केली.
छत्रपती संभाजी महाराजांचा नवीन पक्ष काढण्याबाबतचा निर्णय हा सर्वस्वी त्यांचा व्यक्तीगत आहे. मात्र मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजून आपली भूमिका उभी केलेली नाही. आरक्षणाच्या प्रश्नासाठी सर्वांना एकत्रित भूमिका घेवूनच पुढे जावे लागेल. मराठा आरक्षण पदरात पाडुन घेण्यासाठी समाजातील सर्व संघटनांना एकत्रितपणे दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही.