सुदाम देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : मालमत्तेबाबत होणाऱ्या व्यवहारातील दस्त नोंदणीत ८० टक्के मराठीचाच वापर सुरू आहे. मालमत्तेचे व्यवहार करताना दस्तातील मजकूर मराठीत असावा याबाबत नागरिक आग्रही आहेत. दस्त नोंदणीची प्रक्रिया संगणकीकृत असली तरी त्यावरही मराठीचे स्थान अव्वल असल्याचे दिसून येते.
‘ माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जगल्या
दऱ्याखोऱ्यातील शिळा’
असे अभिमानाने सांगणाऱ्या कवी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन. हा दिवस जगभर मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनेटच्या युगात मराठी भाषा संवर्धनाचे मोठे आव्हान साहित्यिकांसमोर आहे. अशा स्थितीतही मालमत्तेसारख्या सर्वात महत्त्वाच्या अशा दस्त नोंदणीत मराठीचा वापर ८० टक्के होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा मुद्रांक शुल्क विभागातर्फे मालमत्ता खरेदी- विक्रीचे व्यवहार होतात. त्यासाठी जिल्ह्यात दरमहा ७ ते ८ हजार दस्त नोंदणी होते. खरेदी खत, साठे खत, बक्षीस पत्र, गहाण खत, मृत्यूपत्र, भाडेपट्टा करार, मुखत्यार पत्र, खरेदी पत्र, वेगवेगळ्या क्षेत्रातील करारनामे असे दस्ताचे प्रकार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात हे सर्व व्यवहार करताना मराठीचाच सर्वात जास्त वापर होत आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयात ही दस्ताची नोंदणी होते. पूर्वी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर काळ्या शाईने दस्त लिहिला जायचा. टपोरे अक्षर, काळ्या शाईचा वापर, सुवाच्छ मजकूर, कुठेच खाडाखोड नाही, विनाकारण शब्दांमध्ये अंतर सोडलेले नाही, मोकळ्या जागा, दुरुस्तीला कुठेच वाव नसलेली दस्त एकटाकी लिहिली जायची. असे दस्त वाचताना मराठी अक्षरे बघून मन भरून यायचे. आता हे हस्तलिखित दस्त इतिहासजमा होत आहेत. पूर्वी हस्तलिखित सोबत टंकलिखितही दस्त असायचे. त्यावरची मराठी अक्षरेही खुलून दिसायची. गेल्या पाच ते सहा वर्षापासून संपूर्ण दस्त नोंदणी संगणकीकृत झाली आहे. ई-चलन भरले जात असल्याने स्टॅम्प पेपर बाद झाले आहेत. काही व्यवहारातच त्याचा वापर दिसतो. दस्त नोंदणी संगणकीकृत झाली असली तरी त्यावरही मराठीच अव्वल आहे.
----------
जिल्ह्यात होणाऱ्या एकूण दस्त नोंदणीमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहारातील दस्तात मराठी भाषेचा वापर होतो. पुणे, मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटियन सिटीमध्ये इंग्रजीतून दस्त लिहिले जातात. एमआयडीसीचे भाडेपट्टे इंग्रजीत होतात. मात्र नगर जिल्ह्यात ग्रामीण भाग मोठा असल्याने जास्तीत जास्त दस्त लेखनासाठी मातृभाषा म्हणून मराठीचाच वापर होतो.
- राजेंद्र पाटील, मुद्रांक जिल्हाधिकारी
--------
बांधकाम व्यावसायिक, बँकासोबत केल्या जाणाऱ्या व्यवहारात, मॉरगेजमध्ये इंग्रजीतून दस्त लेखनाची मागणी असते. सामान्य नागरिक मात्र मराठीतून दस्त लिहिण्याबाबत आग्रही असतात. मालमत्ता, पैशासंबंधी व्यवहार असल्याने दस्तात काय लिहिले आहे हे कळावे यासाठी नागरिकांचा मराठीला आग्रह असतो.
- बबनराव सुंबे, दस्तलेखक