योगेश गुंड, अहमदनगरपश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याची सीमारेषा असलेला आणि मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून इतिहासात महत्त्व असलेल्या निजामशाहीकालीन कलावतीचा ऐतिहासिक महाल जवळपास नामशेष झाल्यात जमा आहे. या महालाच्या आता फक्त खाणाखुणा उरल्या आहेत. भातोडी (ता.नगर) परिसरात कधीकाळी ऐटीत उभ्या असलेल्या या महालाचे आता फक्त अवशेषच उरल्याने मराठवाड्याची सीमारेषाच पुसण्याच्या मार्गावर आहे.भातोडी (ता.नगर) परिसरातील मराठवाड्याच्या सरहद्दीवर निजामशाहीच्या काळात या परिसरात उत्तम कलाकृती, सुबक कोरीव काम आणि देखण्या वास्तुचा अजोड नमुना असलेल्या कलावतीच्या महालाची उभारणी करण्यात आली. महाल परिसरात निजामशाहीच्या काळात नाच गाणी, साठमारी, हत्ती व बलाढ्य पहिलवान यांच्यातील झुंजी, कुस्त्या, तलवारबाजी, एकांग बाजीच्या कसरती होत होत्या. निजामशहाच्या परिवारातील सदस्यांसाठी गावाच्या बाहेर हा महाल प्रशस्त जागेत बांधण्यात आला होता. मात्र देखभालीअभावी या महालाच्या आता फक्त खाणा-खुणा उरल्या आहेत. कधीकाळी निजामशाहीचे वैभव असणारा हा महाल गेल्या पाच शतकांपासून ऊन, वारा, वादळ, पाऊस यांच्या माऱ्यापुढे सपशेल कोसळला आहे. या महालाची वेळीच दुरुस्ती व डागडुजी न झाल्याने हा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आता फक्त नावालाच उरला आहे. हा महाल मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जात होता. याची उभारणीच आजच्या पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या सरहद्दीवर आहे. हा महाल सीमा रेषा म्हणूनच ओळखला जातो. मात्र सततच्या पडझडीमुळे या महालाचे आता फक्त अवशेष पाहण्यासाठी शिल्लक आहेत. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना व कोरीव काम असलेला हा महाल आता शेवटच्या घटका मोजत आहे.आमच्या गावाच्या परिसरात असलेल्या या निजामशाही कालीन महालाची वेळीच डागडुजी झाली असती तर भावी पिढीला या कोरीव कामाचे व उत्तम कलाकृतीचे सौंदर्य पाहता आले असते. हा महाल आमच्या परिसराचे वैभव होता. आता फक्त त्याचे भग्नावस्थेतील अवशेष बाकी आहेत.-शाम घोलपसंचालक, बाजार समिती तथा ग्रामस्थ भातोडी, नगरमराठवाड्याची सीमारेषा पुसणारभातोडी परिसरात असलेला हा कलावतीचा महाल मराठवाड्याच्या सीमारेषेवरच असल्याने हा महाल मराठवाड्याची सीमारेषा म्हणून ओळखला जातो. येथूनच बीड जिल्ह्याची हद्द सुरू होत असल्याने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याची सीमा यामुळे पुसण्याच्या मार्गावर आहे.
मराठवाड्याचे प्रवेशद्वार नामशेष!
By admin | Published: August 03, 2014 11:43 PM