अहमदनगर - राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत १९ पैकी १८ जागांवर बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या गणेश कारखाना परिवर्तन पॅनलने विजय मिळवला. येथील, फक्त एका जागेवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कारखान्यातील सत्ता संपुष्टात आली आहे. हा विखे पाटील यांना धक्का आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या या पराभवाची अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात चर्चा होत असताना या निवडणुकीच्या प्रचारसभेत भाषण केलेल्या लोणी खुर्दच्या महिला सरपंचांच्या भाषणाचीही जोरदार चर्चा होत आहे. सरपंच यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांची मने जिंकली तर आमदार शहाजी बापू पाटलांचा किस्साही सांगितला.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरुद्ध भाजपच्याच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एकत्रित पॅनल असल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. गणेश कारखाना सध्या विखे पाटील यांच्या प्रवरा कारखाना व्यवस्थापनाच्या ताब्यात आहे. मात्र, सभासदांनी निवडणुकीच्या माध्यमातून हा कारखाना विखे पाटील यांच्या ताब्यातून काढून घेतला आहे. या कारखान्याच्या निवडणूक प्रचारात बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांच्या समक्ष जाहीर सभेत महिला सरपंचाने केलेले भाषण तुफान गाजलं. प्रभावती घोगरे असं या महिला सरपंचाचं नाव असून लोणी खुर्दच्या त्या सरपंच आहेत.
जिल्ह्यातील नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करताना त्यांनी अस्सल नगरी भाषेत टोले लगावले. विखे पाटलांनी जिथे-तिथे तेच पाहिजेत. गावच्या टपरीचं उद्घाटन असेल तरी हेच... एखाद्याच्या लग्नाच्या पत्रिकेतही ह्यांचच नाव पाहिजे, असे म्हणत बोचरी टीका केली. यावेळी, गणेश कारखान्याचा इतिहास आणि प्रवरा नगरच्या राजकीय इतिहासावरही भाष्य केलं. तर, निळवंडे धरणाच्या उद्घाटन सोहळ्याचा किस्सा सांगताना खासदार सुजय विखे पाटील यांना दादा.. दादा.. म्हणत चांगलंच डिवचलं.
घोगरे यांनी भाषण करताना सांगोल्याचे प्रसिद्ध आमदार शहाजी बापू पाटील यांच्या भेटीचा किस्साही सांगितला. सांगोल्याला पाहुण्यांकडे गेले होते, तेव्हा शहाजी बापू पाटील भेटले. मला विचारलं, पाहुणे कुठले? मी म्हटलं प्रवरा नगर... मग ते म्हणाले अरे बाप रे... आम्हाला तुमच्याकडचं घबाड भेटलं म्हणूनच आम्ही ४० जण ओक्के झालो... शहाजी बापूंच्या या विधानावर तुम्ही ओक्के झाला मग आम्हीही ओक्के झालो... असे प्रत्युत्तर त्यांना दिल्याचं सरपंच प्रभावती घोगरे यांनी म्हटलं. त्यांच्या या भाषणाला उपस्थितांनी हसून आणि टाळ्या वाजवून दाद दिली. सध्या त्यांचं भाषण सोशल मीडियावरही चांगलंच व्हायरल झालं आहे.