जिल्ह्यातील नगर, पारनेर, श्रीगोंदावगळता इतर अकरा बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील मार्च महिन्यात लॉकडाऊन केला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील अकरा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका स्थगित केल्या गेल्या. त्यामुळे विद्यमान संचालकांना मुदतवाढ मिळाली. लॉकडाऊन शिथील करत सरकारने सभा, निवडणुका, कार्यक्रमांना परवानगी दिली. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने निवडणूक स्थगित करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाला येत्या २४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळांना कमी अधिक प्रमाणात एक वर्षे जास्तीचे मिळाले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीत २१ संचालक असतात. त्यांच्यातून सभापती व उपसभापतींची निवड करण्यात येते. जिल्ह्यातील अकोले, जामखेड, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीरामपूर आणि श्रीगांदा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत सन २०२० मध्ये संपलेल्या आहेत. त्यामुळे मागील वर्षात या निवडणूका होणे अपेक्षित हाेते. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच निवडणूक पुढे ढकलल्या गेल्या आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणूक पुढे ढकलल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निवडणुकांना गेल्या वर्षभरात दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाल्याने संचालक मंडळाचा कालावधीतही वाढ झाली आहे.
...
विद्यमान संचालकांना वाढीव कालावधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायटी, सहकारी संस्था, बाजार समितीच्या विद्यमान संचालकांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळ पुढील निवडणूक होईपर्यंत कायम राहणार आहे. कोरोनामुळे संचालकांना ही संधी मिळाली आहे. पण, सभा घेण्यास निर्बंध असल्याने त्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.