अहमदनगर : कोरोनाच्या तिसरा लाटेच्या पार्श्वभूमीवर दुपारी चारनंतर दुकाने उघडी ठेवण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. सकाळी ७ ते दुपारी चार अशी दुकानांची वेळ असल्याने सकाळपासूनच बाजारात ग्राहकांची गर्दी होत आहे. दुकानेही सकाळी आठपासूनच उघडण्यात येत आहेत. एरव्ही कापडबाजारात दुपारी चारनंतर गर्दी असायची, ती आता सकाळी दिसून येत आहे.
नगर शहरातील कापड बाजार, नवी पेठ, महात्मा गांधी रोड, चितळे रोड, सावेडी भागातील प्रोफेसर चौक, नगर-मनमाड रोड, पाइपलाइन रोड येथील बहुतांश दुकाने सकाळी आठ वाजताच उघडत आहेत. त्यामुळे ग्राहकही खरेदीसाठी सकाळी नऊ वाजल्यापासूनच रस्त्यावर येत आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून ग्राहकांची वर्दळ सुरू होत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून दुकानदार आपला व्यवसाय करीत आहेत.
रविवार (२७ जून) पासून जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढून सर्व दुकानांना सकाळी ७ ते दुपारी चार वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. या नियमांचे पालन करून सर्व व्यापारी सकाळी लवकर येऊन दुकाने उघडत आहेत. लग्नसराई सुरू असून, त्याची खरेदी करण्यासाठी सकाळी आठ वाजल्यापासूनच ग्राहक बाजारपेठेत दाखल होत आहेत. महिलावर्गही खरेदीसाठी बाजारात येत आहे. यामुळे दुकानदार व ग्राहकांनाही सकाळी लवकर येण्याची सवय लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व दुकानदार मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत असून, संध्याकाळी चारनंतर सर्व दुकाने बंद होत आहे. सायंकाळी पाचनंतर संचारबंदी असल्याने बाजारात शुकशुकाट दिसत आहे. या सर्व परिस्थितीवर महापालिकेचे पथकही नियंत्रण ठेवत आहे.
---------
एकवीरा चौकातील भाजीबाजार उठविला
कोहिनूर मंगल कार्यालय ते एकवीरा चौक या रस्त्यावर मंगळवारी सकाळी भाजी बाजार सुरू झाला होता. सकाळी सात वाजल्यापासून इथे भाजीपाला विक्रेते आले होते. मात्र, महापालिकेची गाडी येताच, सर्व विक्रेत्यांनी आपले बस्तान गुंडाळले. इतर दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी असताना भाजी विक्रेत्यांवर अन्याय का, असा सवाल भाजीपाला विक्रेत्यांनी केला आहे.
-------------
फोटो- अहमदनगर येथील बाजारपेठेतील दुकाने आता सकाळी आठपासूनच सुरू होत आहे. कापड बाजारात सकाळी दहाच्या दरम्यान झालेली ही गर्दी. (छायाचित्र- साजिद शेख)