नेवासा : सासरच्या छळाला कंटाळून पुष्पा अशोक पवार या विवाहितेने गुरुवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथे घडली. याप्रकरणी पती अशोक पवार व सासू सुभद्रा अर्जुन पवार यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२८ फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत पुष्पा हिचा भाऊ सोमनाथ आरसुळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पंधरा वर्षांपूर्वी पुष्पा हिचे अशोक पवार याच्याशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहे. अशोक हा दारू पिऊन पुष्पा हिस मारहाण करीत असत. तिचा छळ करीत असत. त्याचप्रमाणे सासू सुभद्रा ही देखील घरातील कौटुंबिक कारणावरून नेहमीच पुष्पा हिला शिवीगाळ करीत असे. मागील पंधरा दिवसांपूर्वी पुष्पा ही सासरी भांडण झाल्याने माहेरी गोमळवाडी येथे गेली. त्यावेळी पती अशोक हा दारू साठी पैसे मागत होता. त्यावेळी पैसे न दिल्याने अशोक याने पुष्पा हिला लथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर काढल्याचे तिने माहेरी सांगितले. आठ दिवसानंतर पुष्पा हिचे मावस सासरे त्रिंबक पठाडे यांनी पुष्पा हिला पुन्हा सासरी नेले. २७ फेब्रुवारी रात्री दोन वाजेदरम्यान तामसवाडी येथील घरी पुष्पा हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती समजताच पुष्पा हिचा भाऊ सोमनाथ, आई मुक्ताबाई व गावातील नातेवाईक तत्काळ तामसवाडी गेले. यावेळी गावातील ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने पुष्पा हिला नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर पुष्पा हिच्यावर तामसवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर करीत आहेत.
सासरच्या छळास कंटाळून केली विवाहितेने आत्महत्या; पती, सासूविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:32 PM