श्रीगोंदा : प्रसुतीदरम्यान विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर मृत विवाहितेचे नातेवाईक व डॉक्टरांमध्ये बाचाबाची झाली. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. मंजुळा साळवे हे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा पती सतीश साळवे (रा. चिचोंडी रजमान ता. कर्जत) यांनी यासंदर्भात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी होले हॉस्पिटलचे डॉ. भाऊसाहेब होले यांच्याविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मंजुळा हिच्यावर डॉ. होले यांनी प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर पत्नीची प्रकृती खालावली. विशेष उपचारासाठी तिला वीस एप्रिल रोजी अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले. परंतु उपचार चालू असताना तिचा चौदा मे रोजी मृत्यू झाला, असे सतीश साळवे यांनी तक्रारीत म्हटले आहे. मंजुळा हिच्या मृत्यूस डॉ. होले यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, असा आरोपही त्यांनी तक्रारीत केला आहे. घटनेनंतर मयत मंजुळा हिच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. डॉ. होले यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंजुळा हिचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. मंजुळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससूनला पाठविण्यात आला आहे. यामध्ये दोषी आढळल्यास डॉ. होले यांच्यावर राज्य मेडीकल असो.कडून कारवाई करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी) आमची चूक नाही मंजुळा साळवे हिच्यावर प्रसूतीसाठीची शस्त्रक्रिया आमच्या हॉस्पिटलमध्ये झाली. औषधोपचार चालू असताना नैसर्गिक पध्दतीने तिचा मृत्यू झालेला आहे. आमच्याकडून कोणताही हलगर्जीपणा झालेला नाही. उलट मंजुळाचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केला. कुणालाही शिवीगाळ अथवा दमदाटी केलेली नाही. डॉ. भाऊसाहेब होले, श्रीगोंदा
प्रसूतीदरम्यान विवाहितेचा मृत्यू
By admin | Published: May 15, 2014 11:00 PM