याप्रकरणी पाेलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे यांनी फिर्याद दिली आहे. नगर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे तिच्या माता-पित्यांनी मे २०२० मध्ये लग्न लावून दिले. तेव्हा तिचे वय चौदा वर्षे होते. लग्नानंतर काही महिन्यांतच तिला गर्भधारणा झाली. या मुलीला तपासणीसाठी काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. यावेळी सदर मुलगी अल्पवयीन असल्याचे तेथील डॉक्टरांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसांना कळविले होेते. याप्रकरणी चाइल्ड लाइननेही पाठपुरावा केला होता. दरम्यान सदर मुलीस पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथे तिची नुकतीच प्रसूती झाली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कणसे यांनी ससून रुग्णालयात जाऊन सदर मुलीचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात अत्याचार, पोस्को व बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक युवराज आठरे पुढील तपास करत आहेत.
----------------------
पीडितेस बालकल्याण समितीसमोर हजर करणार
अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. पीडित मुलीस पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी बालकल्याण समितीसमोर हजर केले जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे यांनी सांगितले.