अहमदनगर : विवाहितेला जाळून मारल्याप्रकरणी तिचा पती व सास-याला जन्मठेप तर सासूला सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सुनावली. तसेच पती व सासरा यांना प्रत्येकी ५० हजार व सासूला ३० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.नगर तालुक्यातील हिवरे झरे येथील सारिका नवनाथ काटे हिला ९ मार्च २०१६ रोजी तिचा पती नवनाथ, सासरा शिवाजी यांनी अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते. तर सासू पार्वतीबाई ही सारिकाचा छळ करीत होती. या घटनेत सारिका गंभीर भाजली होती. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कान्स्टेबल वाघ यांनी सारिका हिचा मृत्यूपूर्वी जबाब नोंदविला होता. उपचारादरम्यान सारिका हिचा मृत्यू झाला. त्यामुळे पती नवनाथ, सासरा शिवाजी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. तर सासूवर सारिकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यावरुन कलम १०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक परदेशी यांनी घटनेचा पूर्ण तपास करुन तिन्ही आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षाच्यावतीने एकूण ९ जणांची साक्ष घेण्यात आली तर आरोपींच्यावतीनेही बचावाचा साक्षीदार तपासण्याबाबत न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. परंतु त्यांनी तो अर्ज काढून घेतल्यानंतर या खटल्याचा अंतिम युक्तीवाद झाला. सर्व साक्षीपुरावे तपासून न्यायालयाने सारिका हीचा पती नवनाथ व सासरा यांना जन्मठेपेची व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सासू पार्वती हिला सात वर्षांची सक्तमजुरी व ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम सारिका हिच्या दोन मुलांचा सांभाळ करणारा तिचा भाऊ मनोज ज्ञानेश्वर खरात यांना देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील अॅड. अनिल सरोदे यांनी बाजू मांडली़ त्यांना अॅड़ संदीप डापसे यांनी सहकार्य केले.मुलासमोरच जाळले होते आईलाया खटल्यात एकूण ९ साक्षीदारांची साक्ष नोंदविली़ मयत सारिका हिचा मुलगा पवन याच्यासमोरच सारिकाच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून देण्यात आले होते. त्यामुळे या खटल्यात पवनची साक्ष महत्वाची ठरली. राजकीय घराण्याला कठोर शिक्षासारिका हिला जाळून मारणारा सासरा शिवाजी विठोबा काटे हा हिवरे झरे (ता़ नगर) ग्रामपंचायतीचा माजी सरपंच आहे़ तर सासू पार्वतीबाई ही देखील माजी सरपंच आहे. सारिकाचा पती नवनाथ हा एका माजी मंत्र्याचा ड्रायव्हर होता. त्यामुळे त्यांचे राजकारणात वजन होते़ मात्र, पोलीस उपनिरीक्षक परदेशी यांनी राजकीय दबाव झुगारुन घटनेचा तपास योग्य पद्धतीने केला. सर्व साक्षी-पुरावे न्यायालयात सादर केले. हे साक्षी-पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने या राजकीय घराण्याला जन्मठेपेची व सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच महिलांवरील अत्याचाराबाबत तीव्र शब्दात न्यायालयात ताशेरे ओढले.