अहमदनगर : वाहतूक कोंडी ही शहरातील नित्याची बाब पुसून टाकण्याच्या दृष्टीने महापालिकेने पाऊल उचलले आहे. नगर शहरात पुन्हा एकदा नव्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच शहरात असलेली मंगल कार्यालये व लॉन्सची बंद असलेली पार्किंग खुली केली जाणार आहे. पोलीस बंदोबस्तात या कारवाईचा प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली. नगर शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने ती चिंचोळी झाली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली. त्यातच शहरात पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे बाहेरगावाहून येणारी तसेच शहरात जाणारी वाहने रस्त्यातच पार्किंग होऊ लागली. पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी उपायुक्त अजय चारठाणकर यांनी पुढाकार घेतला. सव्वाशे रुग्णालयांचे पार्किंग खुले करण्याची प्रक्रिया त्यांनी राबविली. खंडपीठात प्रकरण गेल्याने त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. माळीवाडा, दाळमंडई, कापडबाजार, चितळे रस्त्यावर मोहीम राबवित चारठाणकर यांनी कोंडलेले रस्ते मोकळे केले. पण ही मोहीम बंद होताच अतिक्रमणाने पुन्हा एकदा डोके वर काढले. आता ही अतिक्रमणे कायमची काढली जाणार आहेत. मोहीम राबविण्यासाठी चारठाणकर यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आला आहे. शहरातील मंगल कार्यालये व लॉन्सची पार्किंग सुविधा नाही. विवाहासाठी येणाऱ्यांची वाहने रस्त्यावरच पार्किंग केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीचे हे कारणही आता दूर होणार आहे. चारठाणकर यांनी मंगल कार्यालये व लॉन्सचे सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. कायदेशीर बाबीची तपासणी करून मंगल कार्यालय व लॉन्सचे पार्किंग खुली केले जाणार आहे. चारठाणकर यांच्या कारवाईमुळे शहरातील सव्वाशे हॉस्पिटल इमारतींवर टांगती तलवार आहे. महापालिकेने हॉस्पिटलची बांधकामे अनधिकृत ठरविली आहेत. त्याविरोधात खंडपीठात व स्थानिक न्यायालयाच याचिका दाखल झाल्याने कारवाई लांबणीवर पडली आहे. आता मंगल कार्यालय व लॉन्सकडे महापालिकेचे लक्ष केंद्रीत केले आहे. (प्रतिनिधी)
मंगल कार्यालये, लॉन्स रडारवर
By admin | Published: May 01, 2016 1:37 AM