अण्णा नवथर
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शासकीय अधिकाऱ्यांच्या तीन वर्षांनी बदल्या होतात. महापालिकांत मात्र एकदा नोकरीत आलेल्या अधिकाऱ्याची जिल्ह्यात अथवा परजिल्ह्यात बदलीच होत नसल्याने अधिकारी एकप्रकारे ‘मठाधिपती’ बनल्यासारखी परिस्थिती आहे.
महापालिकेतील आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, नगर रचनाकार, मुख्य लेखा अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक ही पदे शासनाकडून भरली जातात. याशिवाय महापालिकेत शहर अभियंता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, पाणीपुरवठा प्रमुख, विद्युत विभागप्रमुख, आस्थापना प्रमुख, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख, नगर सचिव ही पदेदेखील महत्त्वाची आहेत. परंतु, या पदांवर महापालिकेत तेच ते अधिकारी वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. त्यामुळे यात काही अधिकाऱ्यांची एकप्रकारे एकाधिकारशाही निर्माण झाली आहे.
आम्ही कसेही काम केले तरी मनपाला आमच्याशिवाय पर्याय नाही, अशी वृत्तीही अधिकाऱ्यांत वाढत आहे. शिवाय नवीन अधिकारी येते? नसल्याने शहराला नवीन कल्पनाही मिळत नाहीत. आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना आयुक्तांनी नुकतेच सक्तीच्या रजेवर पाठविले. बोरगे हे याच मनपात रुजू झाले व येथेच प्रमुख झाले. त्यांच्यावर अनेकदा आरोप झाले. यापूर्वीही ते निलंबित झाले होते. मात्र, कितीही आरोप झाले तरी तेच पुन्हा या पदावर येऊन बसतात हे आश्चर्यकारक आहे. आताही चौकशीत त्यांना क्लीन चीट मिळाली तर तेच या पदावर पुन्हा येतील. असाच प्रकार शहर अभियंता पदाबाबत आहे. या पदावरही मनपातीलच अधिकारी कार्यरत राहतात. या पदावर मध्यंतरी प्रतिनियुक्तीवर शासनाकडून अधिकारी येते? होते. मात्र, गत दोन वर्षांपासून सुरेश इथापे या पदाचा प्रभारी पदभार पाहत आहेत. एखादे पद प्रभारी किती दिवस ठेवता येते, हाही प्रश्न आहे.
................
आरोपानंतरही अधिकारी कार्यरत
- डॉ. अनिल बोरगे यापूर्वी निलंबित झाले होते. मात्र, ते पुन्हा हजर झाले व आरोग्य अधिकारीही बनले. आता पुन्हा त्यांच्यावर कारवाई झाली.
- उपअभियंता रोहिदास सातपुते हे भ्रष्टाचाराच्या आरोपात निलंबित झाले होते. त्यांची चौकशी सुरू आहे. ते पुन्हा हजर झाले व सक्षम अधिकारी मनपाकडे उपलब्ध नाही, असे कारण देत त्यांच्याकडे ‘अमृत’सारख्या योजनेची जबाबदारी दिली गेली.
- अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख उपअभियंता सुरेश इथापे हे प्रभारी शहर अभियंता झाले. दोन वर्षांपासून ते या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. इमारत पूर्णत्वाचा दाखला देण्याची जबाबदारी वर्षानुवर्षे त्यांच्याकडे आहे.
- नगर रचना विभागातील उपअभियंता के. वाय. बल्लाळ यांची या विभागातून बदली होते व ते पुन्हा या विभागातच येतात.
- विद्युत विभागाचा कारभार पाहणारे प्रकल्प अभियंता आर. जी. मेहत्रे हे सतत स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज देतात. मात्र, त्यांचा अर्ज कधीच मंजूर होत नाही, हेही आश्चर्यकारक आहे.
.....................................
लेखा व नगर रचना विभागातील बदल्या नियमित
महापालिकेत नगर रचनाकार, मुख्य लेखा अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक या पदांवरील अधिकाऱ्यांच्याच फक्त बदल्या नियमित होतात. त्यामुळे या पदांवर एकाधिकारशाही निर्माण होत नाही. अन्य पदांवरील अधिकाऱ्यांच्या मात्र राज्यस्तरावर बदल्या होत नसल्याने मनपात साचलेपण व एकाधिकारशाही निर्माण झाली आहे.