तोतया मौलानाने दोन महिलांना घातला गंडा
By admin | Published: April 10, 2017 4:45 PM
मी हजवरुन आलोय़ तुमचे तहसील कार्यालयातील काम तात्काळ करून देतो, असे सांगून एका तोतया मौलानाने श्रीगोंदा शहरातील दोन महिलांना ४० हजाराला गंडविल.
श्रीगोंदा : ‘मी हजवरुन आलोय़ तुमचे तहसील कार्यालयातील काम तात्काळ करून देतो, असे सांगून एका तोतया मौलानाने श्रीगोंदा शहरातील दोन महिलांना ४० हजाराला गंडविल्याची घटना सोमवारी दुपारी श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या परिसरात घडली़या तोतया मौलानाने मदीना अहमद नद्दाम व संगीता दातीर (रा़ श्रीगोंदा) या दोन महिलांची फसवणूक केली आहे़ याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे़मदीना नद्दाम व संगीता दातीर या महिला तहसीलदार कार्यालयात कामानिमित्त आल्या होत्या़ या भोळ्या व वयोवृद्ध महिलांना या तोतया मौलानाने हेरले़ मदीना नद्दाम यांना हा तोतया मौलाना म्हणाला, ‘मै दो बार हज यात्रा करके आया हूँ़ तुम्हारे पती के १७ हजार रुपये मंजूर हो गये है़ वो मै निकाल के देता हूँ़’ मदीना नद्दाम यांच्याबरोबर संगिता दातीर याही तहसीलदार कार्यालयात रखडलेल्या कामासाठी आल्या होत्या़ दातीर यांचेही काम करुन देण्याचे आश्वासन या तोतया मौलानाने दिले़ त्याबदल्यात या तोतया मौलानाने साडे सहा हजार रुपये रोख व दीड तोळे सोन्याचे दागिने त्यांच्याकडून घेतले़ आणि महिलांना रेशनकार्ड झेरॉक्स आणण्यास दुकानात पाठविले़ या दोघीही दुकानात गेल्याची संधी साधून मौलानाने रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन तेथून धूम ठोकली़ मदीना नद्दाम यांनी श्रीगोंदा पोलिसांकडे तक्रार केली आहे़ पोलिसांनी तोतया मौलानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला़ पण तो सापडला नाही़तहसीलदार कार्यालयातील कामे करून घेण्यासाठी कुणालाही एक रुपयाची लाच अथवा दलाली देऊ नये़ कुणाचे काम कर्मचारी करत नसतील अथवा पैशाची मागणी करत असतील तर थेट मला भेटा. कामासाठी लाच घेणे-देणे हा गुन्हा आहे, अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर तहसीलदार महेंद्र महाजन यांनी दिली़