अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचा अंतिम खर्च सादर करण्याची मुदत २२ जूनपर्यंत असल्याने शिर्डी व नगर अशा दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांनी त्यांचा अंतिम खर्च सादर केला असून यात सर्वाधिक ६४ लाख खर्च सुजय विखे यांनी केला आहे. विखेंचे प्रतिस्पर्धी संग्राम जगताप यांचा खर्च ६१ लाख रूपये आहे. शिर्डीतील उमेदवार सदाशिव लोखंडे व भाऊसाहेब कांबळे या दोघांचाही खर्च समान म्हणजे ५९ लाख रूपये आहे.लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर मतदारसंघातून एकूण १९, तर शिर्डी मतदारसंघातून एकूण २० उमेदवारांनी निवडणूक लढवली. या सर्वांनी पहिल्या, दुसऱ्या टप्प्यातील खर्च सादर केला होता. मात्र अंतिम खर्च अद्याप बाकी होता. २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल लागून अहमदनगर मतदारसंघातून भाजपचे सुजय विखे, तर शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांचा विजय झाला.निकालानंतर महिनाभरात अंतिम खर्च सादर करावा, अन्यथा निवड झालेल्या उमेदवारांची निवड रद्द होते आणि जे पराभूत आहेत, त्यांनाही पुढे साडेपाच वर्षे निवडणूक लढवता येत नाही, असे निवडणूक आयोगाने या उमेदवारांना कळवले होते. त्यानुसार सर्वच उमेदवारांनी २२ जूनपूर्वी अंतिम खर्च सादर केला.नगर मतदारसंघात सुजय विखे यांचा खर्च सर्वाधिक ६४ लाख ४९ हजार ३३२ एवढा आहे. त्यानंतर संग्राम जगताप यांनी ६१ लाख ८ हजार १३८ एवढा खर्च नोंदवला आहे. याशिवाय अपक्ष संजीव भोर ६ लाख ९०, कमल सावंत ४ लाख ४१ हजार, भास्कर पाटोळे १ लाख, आबिद शेख १ लाख ४० हजार, ज्ञानदेव सुपेकर १ लाख १५ हजार, नामदेव वाकळे १लाख ५५ हजार, सुधाकर आव्हाड यांनी ३ लाख ५३ हजार खर्च नोंदवला आहे.शिर्डी मतदारसंघात काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांनी ५९ लाख ७९ हजार १३२, तर शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी ५९ लाख ७३ हजार १८३ रूपये एवढा खर्च केला आहे. याशिवाय अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी २ लाख ८१ हजार, बन्सी सातपुते यांनी ७ लाख ४२ हजार, सुरेश जगधने ४ लाख ३९ हजार, प्रकाश आहेर २ लाख ९३ हजार, संजयसुखदान १४ लाख ४६ हजार, प्रदीप सरोदे यांनी ८ लाख ५२ हजार खर्च नोंदवला.
खासदार सुजय विखे यांनी केला सर्वाधिक खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 4:12 PM