श्रीरामपूर : नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी भाजप नेते प्रकाश चित्ते यांच्यावर येथील दिवाणी न्यायालयात ५ कोटी रुपयांच्या बदनामीचा दावा ठोकला आहे. याप्रकरणी येत्या सोमवारी चित्ते यांना न्यायालयाने हजर होण्याचे आदेश बजावले आहेत. न्यायालयाने चित्ते यांना सर्व साक्षीदार व दस्तऐवज १४ रोजी सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयात गैरहजर राहिल्यास सुनावणी होऊन निर्णय दिला जाईल, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.
भाजपचे चित्ते यांच्या नेतृत्वाखाली शहरात छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समिती गठीत करण्यात आली आहे. पालिकेने स्वखर्चाने तयार केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकामध्ये बसवावा, अशी या समितीची जुनी मागणी आहे.
शिवाजी चौकामध्ये ३१ मार्चला रात्री काही तरुणांनी अचानकपणे महाराजांचा अन्य एक अश्वारूढ पुतळा आणून बसविला. मात्र, पोलीस प्रशासनाने तरुणांना ताब्यात घेत हा पुतळा त्या ठिकाणाहून अन्यत्र हलविला. त्यानंतर चित्ते यांनी ४ एप्रिलला शहर बंदची हाक दिली होती. नगरपालिका पुतळा बसविण्यास चालढकल करत आहे, तसेच पुतळा शहरातील गोविंदराव आदिक नाट्यगृहासमोर उभारण्याचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. चित्ते यांनी यासंबंधी काही पत्रके शहरात वितरित केली होती.
पुतळ्याची मूळ जागा बदलविण्याचा आपला कोणताही विचार नव्हता. मात्र, तरीही चित्ते यांनी जाणूनबुजून जनतेची दिशाभूल केली. बदनामीकारक आरोप केले. शहरवासीयांमध्ये आपली प्रतिमा मलीन केली. नगरपालिकेची आगामी काळातील निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून स्वत:चा स्वार्थ साध्य करण्याचा यामागे चित्ते यांचा हेतू आहे, असे आदिक यांनी म्हटले आहे.
--------
कुटुंबाचा लौकिक : आदिक
आपले चुलते दिवंगत बॅरिस्टर रामराव आदिक हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यांनी दीर्घकाळ राज्यात मंत्रीपदावर काम केले. वडील गोविंदराव आदिक यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा राज्यात मोठा नावलौकिक आहे. समाजात मोठे स्थान आहे. त्यामुळेच जनतेने लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून दिले. मात्र, चित्ते यांनी सातत्याने चुकीच्या बातम्या व गैरसमज पसरवत प्रतिमा खराब करत आहेत, असा आरोप नगराध्यक्षा आदिक यांनी केला आहे. चित्ते यांच्याकडून नुकसानभरपाईचा ५ कोटी रुपयांचा आदेश पारित करावा, अशी आदिक यांची मागणी आहे.
---------