अहमदनगर : ९ डिसेंबरला झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर नगरकरांचे लक्ष्य महापौर निवडीकडे लागले आहे. २८ डिसेंबरला सकाळी ११ वाजता मनपाच्या सभागृहात नव्या महापौर, उपमहापौरांची निवड होणार आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी याबाबत आदेश काढला आहे. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेत शिवसेना(२४), भाजप (१४), राष्ट्रवादी(१८), काँग्रेस(५), बसपा(४), सपा(१), अपक्ष(२) असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये बेबनाव झाल्याने त्यांची युती होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला महापौर पदापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये महापौर पदासाठी अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे यांची नावे चर्चेत आहेत. महापौर पदाच्या उमेदवाराचे नाव मातोश्रीवरून घोषित होईल, असे उपनेते अनिल राठोड यांनी सांगितले.
भाजपकडून भैया गंधे, बाबासाहेब वाकळे, स्वप्निल शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र भाजपाच्या निष्ठावंत शिलेदाराला ही संधी मिळू शकते. महापालिकेतील त्रिशंकू अवस्था पाहता महापौर नेमका कोणाचा होणार याकडे राज्याचे लक्ष्य लागले आहे. दरम्यान शिवसेना-भाजपाचे नगरसेवक सहलीवर रवाना झाले असून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बुधवारी नाशिकला गटनोंदणीसाठी रवाना झाले.