बाळासाहेब बोराटे यांना शिवसेनेतूनच विरोधअहमदनगर : महापौरपदाची निवडणूक दोन-तीन दिवसांवर आली असताना अद्यापही महापौरपदाच्या उमेदवाराचा घोळ मिटलेला दिसत नाही. केवळ नावांचीच चर्चा असून सेना वगळता कोणत्याही पक्षाने महापौरपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी बाळासाहेब बोराटे यांचे नाव घोषित केले, मात्र शिवसेना दुभंगली असल्याने नक्की महापौर कोण होणार? याचा घोळ कायम आहे. सेनेचे निम्मे नगरसेवक सहलीवर, तर निम्मे नगरसेवक शहरात असून त्यांनी बोराटे यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली आहे.कोणते तरी दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय महापौर होणे अशक्य आहे. मात्र कोण कोणाला पाठिंबा देणार? यावरून सध्या संभ्रम आहे. बोराटे यांची सेनेने उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांना आता सेनेमधूनच विरोध होत आहे. बोराटे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निम्मे नगरसेवक सहलीवर तर निम्मे नगरसेवक शहरात आहेत. सहलीवर गेलेले नगरसेवक बहुतांशी नवे आहेत, तर शहरात थांबलेले नगरसेवक जुने आहेत. त्यांनी बोराटे यांच्या उमेदवारीवर नापसंती व्यक्त केली आहे. त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्याचे दिसते आहे. त्यामुळे शिवसेनेचे निम्मे नगरसेवक नेमका कोणाला पाठिंबा देणार? अशी चर्चा आहे.दुसरीकडे उमेदवारी जाहीर केली नसली तरी भाजपचे नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांनी महापौरपदासाठी जुळवाजुळव केली आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवकही त्यांनी गळाला लावल्याची चर्चा आहे. भाजपचे सर्वच्या सर्व नगरसेवक वाकळे यांच्या पाठिशी असल्याची सध्याची स्थिती आहे.राष्ट्रवादी काँग्रेसही मैदानातअहमदनगर : भाजपाला बिनशर्त पाठिंबा देण्याचा इन्कार करत राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेच्या महापौर निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे़ राष्ट्रवादीकडून महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने अखेरच्याक्षणी या निवडणुकीची रंगत वाढली आहे़महापालिकेत शिवसेना २४, राष्ट्रवादी एका अपक्षासह १९, भाजप १४, काँग्रेस ५, बसपा ४, अपक्ष व समाजवादी पक्ष प्रत्येकी १, असे पक्षीय बलाबल आहे़ शिवसेना-भाजपाची नैसर्गिक युती होईल, असा अंदाज होता़ महापौर निवडणूक तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे़ अद्याप सेना- भाजपाचा सूर जुळलेला नाही़ सर्वाधिक संख्याबळ असलेल्या सेनेला बाजूला ठेवून सत्ता स्थापनेची गणिते राष्ट्रवादी व भाजपाकडून मांडली जात आहेत़ राष्ट्रवादी भाजपाला बिनशर्त पाठिंबा देण्याच्या तयारीत होती़ परंतु, सोमवारी राष्ट्रवादीने स्वत: उमेदवार उभा करणार असल्याचे जाहीर केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत़ काँग्रेसने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यास त्यांचे संख्याबळ २४ होते़ शिवसेनेकडेही २४ नगरसेवक आहेत़ या दोन्ही पक्षांचे संख्याबळ समान होत असल्याने भाजपा व बसपाच्या नगरसेवकांना महत्व येणार आहे़ तिन्ही पक्ष निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरल्यास ऐनवेळी घोडेबाजार होण्याची दाट शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस महापौर पदाचा उमेदवार देणार आहे़ काँग्रेसशी चर्चा करून पुढील रणनिती ठरविली जाईल़ भाजपाला पाठिंबा देण्याचा पक्षाचा अधिकृत निर्णय झालेला नाही़ भाजपाशी यासंदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नसून, महापौर पदासाठीचा राष्ट्रवादीचा उमेदवार ऐनवेळी ठरेल़ त्यानुसार रितसर अर्ज दाखल करण्यात येईल़- संग्राम जगताप, आमदार, राष्ट्रवादीशरद पवारांची बैठक लांबणीवरमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत येत्या बुधवारी बैठक होणार होती़ मात्र ती बैठक लांबणीवर पडली आहे़ महापौर पदासाठीची निवडणूक शुक्रवारी होत असून, त्यापूर्वी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक होईल, असे चित्र सध्या तरी दिसत नाही़ त्यामुळे राष्ट्रवादीची पुढील रणनिती काय असेल, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
शीला चव्हाण यांनी घेतला अर्जराष्ट्रवादीचा मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसने महापौर निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता़ मात्र काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी त्यांच्या पत्नी नगरसेविका शीला चव्हाण यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे़ महापौर-उपमहापौरपदासाठी सोमवारी कोणीही अर्ज दाखल केला नाही.