लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरातील पाणी उपसा केंद्राचे भारनियमन त्वरित बंद करण्यासाठी महापौर सुरेखा कदम यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठविले आहे. यामध्ये भारनियमनामुळे ऐन सणासुदीत शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून अत्यावश्यक सेवेतील विशेष बाब म्हणून विद्युतपुरवठा सुरळित करण्याच्या सूचना यंत्रणेला करण्याची मागणी बावनकुळे यांच्याकडे महापौर कदम यांनी केली आहे.
अहमदनगर महापालिकेच्या वतीने वसंतटेकडी येथून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या ठिकाणाहून ग्रामीण भागासाठी टँकरही भरले जातात. शहरात पाणी वितरणासाठी वसंतटेकडी येथे मोटारीव्दारे पाणीवाटपासाठी उंच टाक्या भरल्या जातात. त्यानंतर पाण्याचे वितरण केले जाते. मात्र गेल्या १० ते १२ दिवसांपासून या भागाचा विजपुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा वितरणाच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. परिणामी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. आगरकर मळा, बाळाजी बुवा संपवेल, लालटाकी येथील वितरण केंद्राचांही विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऐन सणासुदीत तीव्र पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. ही परिस्थिती विचारात घेऊन पाणीपुरवठा केंद्र वसंतटेकडी, आगरकर मळा संपवेल, सिध्दार्थनगर उंच टाकी, बाळाजी बुवा संपवेल या ठिकाणी भारनियमन करु नये, याबाबत आपण विशेष लक्ष्य घालून विद्युत पुरवठा सुरळित ठेवण्याचे आदेश महावितरणला द्यावेत, असेही महापौर सुरेखा कदम यांनी पत्रात म्हटले आहे.