अहमदनगर : नगरच्या महापाैरपदाचा चेंडू महाविकास आघाडीच्या राज्य समन्वय समितीच्या कोर्टात आहे. समितीच्या बैठकीत महापौर कुणाचा होणार, याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे समितीच्या बैठकीकडे शहरातील राजकीय नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ येत्या ३० जून रोजी संपुष्टात येत आहे. महापौर निवडणुकीसाठीचा प्रस्ताव महापालिकेने विभागीय आयुक्तांना पाठविला आहे. नगरविकास खाते शिवसेनेकडे आहे. नगर महापालिकेत शिवसेनेचे पारडे जड आहे. सेनेने महापौरपदावर दावा ठोकला आहे. सेनेच्या पदाधिकारी नगरसेवकांची भिस्त पूर्वीप्रमाणेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आहे.
राज्यात सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी आहे. या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन समन्वय समितीची स्थापना केलेली आहे. नगरमध्ये महापौरपदाबाबत सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कमालीचे मतभेद आहेत. त्यामुळे नगरच्या महापौरपदाचा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. त्यासाठी लवकरच बैठक होईल, असे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले. सेनेने महापौर पदासाठी आघाडी घेतलेली आहे. कारण या तिन्ही पक्षांमध्ये त्यांचे संख्याबळ अधिक आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादीत शांतता आहे. त्यांच्या अंतर्गत बैठका झालेल्या आहेत. परंतु, वरिष्ठांचा निर्णय अंतिम राहिल, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येते. मात्र स्थानिक पातळीवर हे दोन्ही पक्ष कसे एकत्र येतात, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. काँग्रेसनेही महापौरपदासाठी आग्रह धरला आहे. काँग्रेसचे संख्याबळ कमी असले तरी राष्ट्रवादीच्या मदतीने महापौरपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचता येईल, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे.
.....................
मुंबईतच खलबते
सेनेच्या पदाधिकारी नगरसेवकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली आहे. तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सेनेचा महापौर करण्याची मागणी स्थानिक नेत्यांनी केलेली आहे. राष्ट्रवादीचा निर्णय उपममुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपविण्यात आलेला आहे. ते घेतील तो निर्णय राष्ट्रवादीला मान्य असणार आहे. काँग्रेसच्या वतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बाजू मांडणार असल्याचे सांगण्यात आले.
...