शिर्डी : सिंहस्थातील पर्वणी काळात साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहे़ या काळात रोज किमान दोन लाख भाविकांना प्रसादालयात भोजन देण्याची व पन्नास हजारावर नाष्टा पाकिटे देण्याची तयारी संस्थानने केली असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली़आयएसओ मानांकन प्राप्त असलेल्या संस्थान प्रसादालयात रोज सरासरी अठ्ठावीस ते तीस हजार भाविक केवळ दहा रूपयात दर्जेदार प्रसाद भोजन घेतात़ सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सेवा देत असलेल्या या प्रसादालयात गेल्या वर्षभरात २ कोटी ३२ लाख भाविकांनी भोजनाचा आस्वाद घेतला़ गेल्या गुरूपौर्णिमेला एकाच दिवशी ९७ हजार भाविकांनी प्रसाद भोजनाचा स्वाद घेतला़सिंहस्थ काळातील वाढती गर्दी विचारात घेऊन प्रसादालय रात्री गरजेनुसार अधिक वेळ सुरू ठेवण्यात येणार आहे़ मुख्य प्रसादालयाव्यतिरिक्त नवीन भक्तनिवास (पाचशे रूम), साईआश्रम, साईनाथ रूग्णालयात ठराविक वेळेत देण्यात येणारी भोजन व्यवस्था पूर्ण क्षमतेने चालवण्यात येणार असल्याचे उपकार्यकारी अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले़सर्वसाधारण दिवशी संस्थान दहा ते पंधरा हजार नाष्टा पाकिटे बनवते, यासाठी प्रत्येकी चार रूपये आकारले जातात़ या पाकिटात भाजी व पाच पुऱ्या असतात़ सिंहस्थ काळात जवळपास रोज पन्नास हजार नाष्टा पाकिटे बनवण्यात येणार आहेत़संस्थानचे साईआश्रम, नवीन भक्तनिवास, दोन्ही रुग्णालये व सर्व सात वाहनतळांवर नाष्टा पाकिटे सकाळच्या वेळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत़ याशिवाय या सर्व ठिकाणी कॅन्टीन विभागाच्या माध्यमातून चहा, कॉफी, दूध, मिनरल वॉटर व बिस्किटे नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे़(तालुका प्रतिनिधी)
दोन लाख भाविकांची भोजन व्यवस्था
By admin | Published: August 13, 2015 11:01 PM