शेवगाव : पुरवठा विभागातील सावळ्या गोंधळाने संपूर्ण महसूल विभागाची प्रतिष्ठा पणाला लागली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेआड ‘अर्थपूर्ण’ घडामोडींची चर्चा तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील मालाला पाय फुटतात कसे असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
पुरवठा विभागामार्फत गहू, तांदूळ, डाळी, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे शिधापत्रिका धारकांना वाटप होते.? प्रशासनाकडून स्थानिक पातळीवरील स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य वाटप केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्याचे मोफत वाटप केले. याच संधीचा फायदा घेत पुरवठा विभागाचा माल खुल्या बाजारात काळ्या बाजाराने विकणारी टोळी तालुक्यात सक्रिय झाली. पुरवठा विभागातील काही कर्मचाऱ्यांनी काही मोजक्याच दुकानदारांशी असलेली सलगी चर्चेचा विषय ठरली आहे. यामुळे पुरवठा यंत्रणेवर कुणाचे नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.
तालुक्यातील खानापूर, शहरटाकळी, अमरापूर आदी ठिकाणी धान्याने भरलेली वाहने नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडली गेली. मात्र अमरापूर येथील घटनेत धान्य भरलेला टेम्पो मिळून आल्यानंतर त्याच्या संदर्भात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, पोलीस ठाण्यामध्ये प्रवेश करेपर्यंत पथकाच्या सोबत असलेला टेम्पोचा चालक अचानक पसार कसा झाला? याचे गौडबंगाल अद्याप कायम आहे.
या प्रकरणाशी निगडित दोघा जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात पुरवठा विभागाच्या वरिष्ठ लिपिकाने गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाची सूत्रे पोलिसांच्या हाती आहेत. शासकीय गोदामातून धान्याला पाय कसे फुटले? ते धान्य कोणाला दिले जाणार होते? या प्रकरणी कोणत्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून वाहतूक व्यवस्था प्रणालीने हे धान्य अमरापूरपर्यंत आणले हे प्रश्न कायम आहेत.
------
अमरापूर येथे पकडलेल्या टेम्पोबाबत गुन्हा दाखल आहे. मी स्वतः या प्रकरणाच्या संदर्भात माहिती घेत असून विविध ठिकाणचा धान्याचा साठा रजिस्टरप्रमाणे तपासणी मोहीम हाती घेतली आहे. लवकरच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन कारवाई केली जाईल. अशा घटना रोखण्यासाठी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे विशेष चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करावी ,अशी मागणी केली आहे.
-अर्चना पागिरे,
तहसीलदार, शेवगाव
----
१२४ स्वस्त धान्य दुकानांमार्फत वाटप
तालुक्यात ६२ हजार ३८५ शिधापत्रिकाधारक असून त्यांना तालुक्यातील १२४ स्वस्त धान्य दुकानांमार्फत प्रतिमहा सरासरी अंत्योदय शिधापत्रिका धारकांना २ हजार ४५० क्विंटल गहू, १ हजार ४७० क्विंटल तांदूळ वाटप केले जाते. प्राधान्य लाभार्थी संख्या १ लाख ४७ हजार ४६६ इतकी असून ४ हजार ४२३ क्विंटल गहू व २ हजार ९४९ क्विंटल तांदूळ वाटप होत असल्याचे अव्वल कारकून तथा प्रभारी निरीक्षक एस. एम. चिंतामण यांनी सांगितले.