अहमदनगर : जिल्ह्यात डेंग्यू, गोवर, गोचिड असे पुरळ आणि तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या बऱ्यापैकी आहे. गोवर हा आजार साधारणपणे लहान बालकांना होण्याचा धोका जास्त असतो. लसीकरण शंभर टक्के होत असल्याने हा धोका कमी झाला असला तरी मोठ्या मुलांनाही गोवर होऊ शकतो, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
ताप येणे, चेहऱ्यावर लाल पुरळ येणे अशा प्रकारची लक्षणे दिसतील तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावेत, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. गोवर व रुबेला हे विषाणूजन्य आजार आहेत. लहान मुलांना हे आजार अधिक प्रमाणात होतात. गोवर व रुबेला निर्मूलनासाठी २०१८ साली राज्यात व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. त्यामुळे लहान मुलांना गोवर होण्याचे प्रमाण घटले आहे.
-------------
असे केले जाते निदान
१ कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला ताप व पुरळ आल्यापासून २८ दिवसांच्या आत गोवर, रुबेलाची तपासणी करणे आवश्यक आहे.
२ त्यामुळे पुरळ आल्यापासून सात दिवसांच्या आत रुग्णाचे रक्तजल नमुने, तसेच घशाचा स्वॅब किंवा लघवीचे नमुने तपासले जातात.
३ आरोग्य विभागामार्फत प्रयोगशाळेत या नमुन्यांची तपासणी करून निदान केले जाते.
---------------
... तर डॉक्टरांना दाखवा...
गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. यात सुरुवातीला ताप येतो. तापासोबतच खोकला, नाक वाहते, तसेच डोळ्यांची जळजळ होणे अशी लक्षणे दिसतात.
- तीन ते पाच दिवसांनंतर चेहऱ्यावर लाल पुरळ येतात. अशी लक्षणे दिसत असतील तर तत्काळ डॉक्टरांना दाखवावे.
गोवर, रुबेलाचे १०० टक्के लसीकरण
- २०१८ मध्ये गोवर - रुबेलाची लसीकरण मोहीम शासनाने सुरू केली होती.
- या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली.
- जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती.
----------------
सध्या गोचिड ताप, डेंग्यूचा ताप आणि गोवरचा ताप असलेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यामध्ये गोवरचा ताप ओळखणे महत्त्वाचे आहे. डोक्याकडून पायाकडे उतरणारा ताप गोवरचा असतो. लसीकरणामुळे लहान मुलांना गोवर होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, १० ते १५ वर्षांच्या मुलांना गोवर होऊ शकतो.
-- डॉ. सूचित तांबोळी, बालरोग तज्ज्ञ
---
डमी क्रमांक- १०७५
नेटफोटोत सेव डमी