तळेगाव दिघे : नांदूर-शिंगोटे रस्त्यावरून मांस घेऊन जाणारा मालट्रक संतप्त नागरिकांनी तळेगाव दिघे येथे अडवून पेटवून दिला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, लोकांनी दगडफेक केल्याने अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी झाला. सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास सोलापूरहून मालेगावकडे मांस घेऊन हा मालट्रक (एमएच ०४ जे ७२०६) जात होता. दरम्यान, राहाता येथे रविवारी असाच मांस घेऊन जाणारा एक ट्रक जमावाने जाळल्याने खबरदारी म्हणून तळेगाव दिघे मार्गाने हा ट्रक चालला होता. नांदूर-शिंगोटे रस्त्याने जात असताना तळेगाव दिघे येथे मालट्रकमधून दुर्गंधी येत असल्याचे काही तरूणांच्या लक्षात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी ट्रक अडवला. अधिक चौकशी केली असता त्यात मांस असल्याचे आढळून आले. त्यामुळे संतप्त जमावाने चालक व क्लिनरला गाडीतून उतरवून मारहाण केली. दरम्यान, ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. तसे शेकडो लोक जमा झाले. संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याने एकच खळबळ उडाली. कोणीतरी पोलिसांना कळवल्याने काही वेळाने पोलीस दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. परंतु लोक आक्रमक झाले होते. दरम्यान, आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीवरच जमावाने दगडफेक केली. त्यात एक कर्मचारी जखमी झाला. पोलिसांनी खबरदारी म्हणून नगरहून आणखी कूमक मागवून घेतली. रात्री उशिरापर्यत गावात तणाव कायम होता. (वार्ताहर)
मांस घेऊन जाणारा ट्रक पेटवला
By admin | Published: September 16, 2014 1:03 AM