शिर्डी : नगर जिल्ह्यात व राहाता तालुक्यासाठी कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी आहे. रविवारी लोणी परिसरातून नगरला कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या ४१ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती तहसिलदार कुंदन हिरे यांनी सोमवारी (दि.६ एप्रिल) दिली.यातील ३२ व्यक्तींना आता चौदा दिवसांसाठी साईबाबा संस्थानच्या साईआश्रम इमारतीत उभारलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. उर्वरित लो रिस्क असलेल्या ९ व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्यात येत आहे. शिर्डीतील या कक्षातील आकडा आता ५५ वर पोहचला आहे. दिल्लीतील कार्यक्रमात सहभाग घेवून आलेला इंडोनेशियातील व्यक्ती कोल्हार, भगवतीपूर, लोणी खुर्द, लोणी बुद्रूक, हसनापुर, दाढ बुद्रूक, पाथरे व हनंमतगाव या सात गावातील पंचवीस व्यक्तींच्या संपर्कात आला होता. या व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठवले असता त्यातील एका व्यक्तीच्या स्त्रावाचा अहवाल पॉझिटीव्ह तर चोवीस जणांचा निगेटिव्ह आला आहे. त्यातील तेवीस व्यक्तींना शिर्डीत संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर रविवारी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसिलदार कुंदन हिरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ संजय गायकवाड, लोणीचे सहाय्यक निरीक्षक प्रशांत पाटील आदींनी या सात गावांची पाहणी केली. लोणी बुद्रूकमधील जो एकजण पॉझिटिव्ह आढळला. त्याच्या संपर्कात आलेल्या ४१ व्यक्तीना रविवारी तपासणीसाठी नगरला पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे.दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नका. जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे साठेबाजी करू नका. स्वस्त धान्य दुकानात अंत्योदय व प्राधान्य कुटूंबातील धान्य वितरण सुरू आहे. येत्या दहा तारखेपासून प्रत्येक व्यक्तीस पाच किलो तांदूळ विनामूल्य देण्यात येणार असल्याचे तहसीलदार हिरे यांनी सांगितले.
‘त्या’ ४१ जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह; शिर्डीत संस्थात्मक विलगीकरण कक्षात ५५ व्यक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 2:13 PM