महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, नियंत्रण कक्ष स्थापन करून राज्यभरात जिल्हानिहाय हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. रुग्णांना बेड मिळवून देणे, औषध उपलब्ध करणे, आयसीयू, व्हेंटिलेटरचे बेड मिळवून देणे अशी अनेक कामांमध्ये राज्यातील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत होत आहे.
महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कोरोना हेल्पलाईनमध्ये काम करणारे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते हे माझ्यासाठी फ्रंटलाईन योद्धे आहेत. ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांना व त्यांच्या नातलगांना मदत करीत आहेत. सध्याच्या दुसऱ्या लाटेमध्ये काम करताना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्या फ्रंटलाईन योद्ध्यांना आम्ही रुपये एक लाखापर्यंतचा मेडिक्लेम विमा देणार आहोत. गेल्या वर्षीदेखील मागील लॉकडाऊनमध्ये युवक काँग्रेसने गरजूंना अन्नधान्य, औषधे व तत्काळ सेवा अशी विविध प्रकारे मदत केली होती. राज्यभरात युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरातून २५ हजार रक्तपिशव्यांचे संकलन केले होते. हे मदतकार्य करताना महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांना कोरोनाग्रस्तांची मदत करताना कोरोनाची लागण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मेडिक्लेम देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे तांबे यांनी सांगितले.