शेवगाव : शाळा-महाविद्यालय सुरू होऊन एक महिना होऊन गेला तरी अनेक विद्यार्थ्यांना एस. टी. पास काढण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहून देखील विद्यार्थ्यांना पास मिळत नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारीनंतर शेवगाव पंचायत समितीचे सभापतीडॉ. क्षितिज घुले यांनी विद्यार्थ्यांसमवेत गुरूवारी शेवगाव एस.टी. बस आगारप्रमुखांना घेराव घातला.डॉ. घुले यांनी युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेवगाव आगाराच्या विद्यार्थी मासिक पास कार्यालयात थेट पोहोचून विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी लागणारे अर्ज आगारात उपलब्ध नव्हते. तसेच कार्यालयात एकच कर्मचारी उपलब्ध होता. तसेच दुपारी तब्बल दोन तास कार्यालय बंद राहत होते. या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी सभापती डॉ. घुले यांनी संतप्त विद्यार्थ्यांसमवेत आगारप्रमुख वासुदेव देवराज यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. सभापतींच्या सूचनेनुसार आगार प्रमुख देवराज यांनी आजपासूनच विद्यार्थी मासिक पास कार्यालय सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत सलग सुरू राहील. विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक होणार नाही. त्यासाठी तातडीने आणखी दोन कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येतील, असे आश्वासन दिले.सभापती घुले यांनी यावेळी विद्यार्थ्यांसमोर बोलताना, जर पुन्हा कधी कुणाला अशा प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या, तर त्यांनी थेट पंचायत समिती कार्यालयात येऊन माझी भेट घ्यावी. मी निश्चितच तुमच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असेन, अशी ग्वाही दिली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, तालुका कार्याध्यक्ष ताहेर पटेल, शहराध्यक्ष कमलेश लांडगे यांच्यासह युवक कार्यकर्ते व पासधारक विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.