अहमदनगर : जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजीमंत्री मधुकरराव पिचड हे पुन्हा एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिचड यांनी बुधवारी महसूलमंत्री थोरात यांची मंत्रालयातील त्यांच्या दालनात भेट घेऊन सुमारे अर्धा तास चर्चा केली. बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
पिचड हे भाजपमध्ये असले तरी भाजपाचे अनेक नेते काँग्रेस- राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याच्या मानसिकतेत आहेत. जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक तोंडावर आहे. जिल्हा सहकारी बँकेत विखे विरुध्द थोरात असा सामना रंगणार आहे. विखे हे भाजपचा पॅनल उभा करतील अशी शक्यता आहे. राम शिंदे, पिचड, शिवाजी कर्डिले, बबनराव पाचपुते हे नेते भाजपत असल्याने भाजपचेही पॅनल बलवान बनू शकते. मात्र, सहकारात दोन्ही काँग्रेसचे वर्चस्य असल्याने भाजपचे काही नेते महाविकास आघाडीतीसोबत जुळवून घेण्याच्या मानसिकतेत असल्याचे समजते.
या पार्श्वभूमीवर थोरात- पिचड यांच्या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. पिचड हे विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपमध्ये दाखल झाले. त्यांचे सुपुत्र माजी आमदार वैभव पिचड यांनी विधानसभा निवडणूक भाजपकडून लढविली. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच थोरात व पिचड हे एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. थोरात यांनीही अकोले मतदारसंघातील पठार भागावर लक्ष करत करत पिचड यांना धक्का दिला.
पुढे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. थोरात हे महसूलमंत्री झाले. महसूलमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर पिचड यांनी प्रथमच थोरात यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. सुमारे अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली. बैठकीतील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र जिल्हा बँकेत पुन्हा मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी पावले टाकण्यास सरुवात झाल्याचे बोलले जाते.
तर भेटीचा तपशील समजून घेण्यासाठी थोरात यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयल केला. मात्र संपर्क झाला नाही. बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार व लोकप्रतिनिधींसाठी ही बँक प्रतिष्ठेची आहे. त्यादृष्टीने जुळवाजुळव व चाचपणी सुरु झाली आहे.