शिर्डी : जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या संस्थानाला अशांततेची लागण झाली आहे. विधीमंडळाच्या सुरक्षेलाही लाजवेल अशा अभुतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत व्यवस्थापनाची मंगळवारी रात्री बैठक पार पडली.आजवर संस्थान व्यवस्थापनाशी मनमोकळा संवाद साधू शकणा-या विविध राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांनाही मंगळवारी पोलिसांच्या उपस्थितीत व मोजक्याच प्रतिनिधींना भेटण्याची वेळ आली. संस्थान विरोधी झालेल्या विविध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही उपाययोजना केली. गेल्यावेळी झालेली तोफफोड लक्षात घेवून अध्यक्षांची गाडीही संस्थान भांडाराच्या गोदामात ठेवण्यात आली होती.गेल्या काही दिवसात निर्माण झालेला तणाव व दिवसेंदिवस मंदिराची होणारी बदनामी लक्षात घेवून संस्थान अध्यक्ष हावरे यांनी आलेल्या प्रत्येक शिष्टमंडळाशी भेट घेवून संवादाच्या माध्यमातून कोंडी फोडण्याचा निर्णय घेतला. हावरे यांच्या या निर्णयाचे सर्वांनीच स्वागत करीत त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.व्यवस्थापनाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे व आनंद भोईटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्यासह पोलीस, शिघ्रकृती दलाचे जवान व संस्थान सुरक्षा रक्षक यांनी साईनिवास इमारतीला गराडा घातला होता़ त्रिस्तरीय सुरक्षेबरोबरच सर्वत्र बॅरेगेटींग लावून अडथळे उभे करण्यात आले होते. संस्थान व पोलिसांचे कॅमेरे प्रत्येक हालचाल टिपीत होते. संस्थानचे अध्यक्ष डॉ़सुरेश हावरे पोलीस व भाजपा पदाधिका-यांच्या गराड्यात पुढील गेटने पायीच सभास्थळी गेले. मात्र काही विश्वस्तांनी मागील गेटने जाणे पसंत केले. अध्यक्ष व विश्वस्तांना भेटण्यासाठी प्रत्येक पक्षाचे किंवा शिष्टमंडळाचे केवळ चारच प्रतिनिधी आत सोडण्यात आले. काहींची तर मध्ये जाताना तपासणीही करण्यात आली. पोलिसांच्या उपस्थितीतच अध्यक्षांनी काही मिनीटे प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनाही सभागृहात जाण्यापासून रोखण्यात आले.
कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत साईसंस्थान व्यवस्थापनाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:37 PM