कोपरगाव : कोपरगाव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक एक व अकरा व सोळा या तीन विषयांवर तब्बल पाच तास चर्चा होऊनही भाजप व शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी बहुमतात हे तीन विषय नामंजूर केले आहेत. त्यामुळे सहा तास चाललेल्या या सभेत शहरातील नागरिकांच्या हितासाठी असलेले आठ कोटींचे रस्ते सदस्यांनीच अडविले असल्याचे निष्पन्न झाले.
कोपरगाव नगर परिषदेची मंगळवारी (दि.१६) सभागृहात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली सभा ५ वाजेच्या सुमारास संपली. सुमारे सहा तास चाललेल्या या सभेत एकूण २९ विषय मंजुरीसाठी होते. त्यापैकी २६ विषय हे एका तासात मंजूर करण्यात आले, तर ३ विषयांवर तब्बल पाच तास चर्चा केल्यानंतरही यातून काहीच मार्ग न निघता भाजप व शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी बहुमतात मतदान घेऊन हे विषय नामंजूर केले.
सभेच्या सुरुवातीला अध्यक्ष विजय वहाडणे यांनी सभेच्या नियमांसंदर्भात सभा लिपिकास वाचन करण्यास सांगितले. त्यावर भाजप व शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर १५ सप्टेंबर २०२० रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेले विषय मंजूर करण्यात आले होते. ते विषय या सभेत कायम करण्यासंदर्भातील पहिला विषय होता. तो विषय भाजपचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी या सभेत दोन तास चर्चा केल्यानंतर हरकत घेत हा विषय नामंजूर केला. त्यानंतर विषय क्रमांक ११ असलेल्या बांधकाम विभागामार्फत शहरातील नागरिकांच्या सोयीच्या २८ रस्त्यांच्या कामाला मंजुरी देण्यासंदर्भात तब्बल दोन तास चर्चा करण्यात आली. या चर्चेत नगराध्यक्ष वहाडणे यांनी राजकीय हेवेदावे बाजूला सारून नागरिकांसाठी या कामांना मंजुरी द्यावी, अशी विनंती केली, तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वर्पे यांनी ही कामे मंजूर केली नाही तर ८ कोटींचा हा निधी परत जाऊ शकतो, तसेच फेरअंदाजपत्रक व निविदा काढल्यास नगर परिषदेवर अतिरिक्त खर्चाचा ताण पडू शकतो. त्यामुळे या २८ कामांपैकी काही कामे नामंजूर करा. मात्र, इतर कामांना मंजुरी द्या, अशी विनंती केली. मात्र, या सर्व कामांचे सुधारित फेरअंदाजपत्रक तयार करा. पुन्हा स्थायीच्या सभेत ठेवा आम्ही कामे मजूर करू, अशी भूमिका घेत भाजप व शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी हरकत घेऊन मतदान घेऊन हा विषय नामंजूर केला.
त्यानंतर कोपरगाव नगर परिषदेच्या इमारतीवर व येसगाव येथील साठवण तलाव येथे सोलर पॅनल बसविणे हा विषयदेखील तासाभराच्या चर्चेनंतर मतदान घेऊन नामंजूर करण्यात आला. यावेळी सभागृहात उपस्थित नगसेवकांसह महिला नगरसेवकांनी आमच्या प्रभागात कामेच होत नसल्याचे आरोप केले. त्यावर नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, कामाच्या निविदा तयार असताना त्यांच्या खर्चाची परवानगी मिळणार नसेल, तर विकास कामे होणार तरी कशी, अशी खंत व्यक्त केली. या सभेत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, सभा लिपिक ज्ञानेश्वर चाकने, लिपिक प्रशांत उपाध्याय, भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, तसेच सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
...........
नगरसेवक वर्पे यांची दिलगिरी
राष्ट्रवादीचे गटनेते वीरेन बोरावके यांनी एकाच विषयावर खूप चर्चा होऊन विषयांतर होत असल्याने नगराध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात दोघा-तिघांना बाहेर काढावे, अशी मागणी केली. त्यावर भाजपचे नगरसेवक विजय वाजे यांनी आक्षेप घेत बोरावके यांनी याविषयी माफी मागितल्यानंतरच सभा सुरू होईल अशी भूमिका घेतली. त्यावर नगराध्यक्ष वहाडणे यांनी मध्यस्थी करून राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वर्पे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या विषयावर पडदा पडला.