बोधेगाव : सांसद आदर्श ग्राम योजनेत खासदारांनी दत्तक घेतलेल्या शेवगाव तालुक्यातील कांबी गावच्या सरपंच सविता अशोक मस्के, व सदस्य सुरेशचंद्र होळकर यांनी कार्यकाळात ग्रामपंचायतचे हित जोपासण्याबाबत कर्तव्यात कसूर केल्याने त्यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अन्वये पदावर राहण्यास विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांनी अपात्र ठरविले आहे.या आदेशामुळे स्थानिक राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे. सरपंच सविता मस्के व सदस्य सुरेशचंद्र होळकर यांनी नगर भूमापन क्रमांक ३२२, ३२७, ३२८, ३२९, ३३०, ३३९, ३३२ ३३३, ३३४, ३३५, ३५९ च्या जागेबाबत अहमदनगर येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अहमदनगर यांच्याकडील अपील अर्ज क्रमांक १६८४, २०१६ व १९७ ,२०१५ नुसार ३० सप्टेंबर २०१६ रोजी निर्णय दिला. हा निकाल ग्रामपंचायत विरोधातगेला.या निकालाबाबत संचालक भूमिअभिलेख नाशिक यांच्याकडे अपील करावे किंवा नाही, यासाठी ग्रामपंचायतीमध्ये २७ एप्रिल २०१६ रोजी मासिक सभा ठेवण्यात आली होती. त्यामध्ये सरपंच सविता मस्के व सदस्य सुरेशचंद्र होळकर यांनी अपील करू नये, असे मत बैठकीत नोंदविले होते.ग्रामपंचायत जागेबाबत विरोधात गेलेल्या निकालाबाबत वरिष्ठ कार्यालयास अपील करण्याबाबत बैठकीत मत नोंदविणे आवश्यक असताना अपील करू नये, असे मत नोंदविल्याने सरपंच व सदस्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्या बाबत माजी सरपंच सुनीलसिंग राजपूत व सहा सदस्यांनी तक्रार दाखल केली होती. त्याची नाशिक विभागीय आयुक्त यांच्या कार्यलयात सुनावणी झाली.विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) प्रमाणे विद्यमान सरपंच सविता मस्के, व सदस्य सुरेशचंद्र होळकर यांना अपात्र ठरविण्याचा आदेश अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे.तक्रारदार राजपूत यांच्या वतीने अॅड. एस. बी. पारनेरे तर सरपंच सविता मस्के व होळकर यांच्या बाजूने अॅड. वेलदे यांनी कामकाज पाहिले.